अकोला - शहरातील ४२ हजार गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन
By आशीष गावंडे | Published: September 10, 2022 07:47 PM2022-09-10T19:47:38+5:302022-09-10T19:47:44+5:30
मनपाकडून १८ ट्रॅक्टर, ५ टिप्पर; निर्माल्यासाठी ९० वाहनांची व्यवस्था
अकाेला:‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या गणरायाला भाविकांनी शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात निराेप दिला. मनपा प्रशासनाने तयार केलेल्या मुख्य गणेश घाटासह शहराच्या विविध भागातील विसर्जन कुंडात मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली हाेती. यादरम्यान, सुमारे ४२ हजार घरगुती गणेश मुर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. याकरीता मनपाकडून झाेन निहाय १८ ट्रॅक्टर, ५ टिप्पर व निर्माल्यासाठी ९० वाहनांची व्यवस्था करण्यात आली हाेती.
विघ्नहर्ता, बुध्दीची देवता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचे ३१ ऑगस्ट राेजी ढाेल ताशांच्या गजरात व माेठ्या उत्साहात आगमन झाले हाेते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करताना काही निर्बंध घालण्यात आले होते. परंतु यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याची प्रचिती आगमना दरम्यान दिसून आली हाेती. घराेघरी, गल्लीबाेळात व प्रमुख चाैकांमध्ये माेठ्या दिमाखात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना शुक्रवारी निरोप देण्यात आला. ‘एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जन स्थळी पोलीस बंदोबस्तासह, मनपाच्या बांधकाम, विद्यूत व माेटार वाहन, स्वच्छता व आराेग्य तसेच अग्निशमन विभागाची यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले.
मुख्य घाटावर भाविकांची गर्दी
मनपा प्रशासनाच्यावतीने महाराणा प्रताप बागेमागील माेर्णा नदीच्या काठावर मुख्य गणेश घाट सज्ज ठेवण्यात आला हाेता. याव्यतिरिक्त हरिहरपेठ, हिंगणा येथे गणेश घाट तयार केले हाेते. दुपारी १ नंतर भाविकांची मुख्य गणेश घाटावर गर्दी झाल्याचे दिसून आले. याठिकाणी मनपाने प्रकाश व्यवस्था, निर्माल्य संकलन व्यवस्था व मुर्ती घेउन जाण्यासाठी टिप्पर, ट्रॅक्टर व घंटागाड्यांची व्यवस्था केली हाेती.
प्रभागांमध्ये गणेश कुंड
मनपाच्या मुख्य गणेश घाटावर गर्दी टाळण्यासाठी शहरातील चारही झाेनमध्ये गणेश कुंड तयार करण्यासाठी माजी नगरसेवक व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हरिष आलीमचंदानी, माजी उपमहापाैर वैशाली शेळके, विलास शेळके, माजी सभागृनेत्या गितांजली शेगाेकार, राहुल देशमुख, माजी उपमहापाैर विनाेद मापारी, निलेश देव यांसह विविध सामाजिक संघटनांचा समावेश हाेता.