अकोला सवरेपचार रुग्णालय : रुग्णाच्या महिला नातेवाईकासह सफाई कर्मचारी आढळला आक्षेपार्ह स्थितीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:56 AM2018-01-25T01:56:29+5:302018-01-25T01:56:54+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. नऊमध्ये एक सफाई कामगार व त्याच वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाची महिला नातेवाईक मंगळवार, २३ जानेवारी रोजी रात्री स्वच्छतागृहात आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. नऊमध्ये एक सफाई कामगार व त्याच वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाची महिला नातेवाईक मंगळवार, २३ जानेवारी रोजी रात्री स्वच्छतागृहात आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षक व वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी या दोघांना रंगेहात पकडून त्याबाबतची तक्रार अधिष्ठातांकडे केली असून, यासंदर्भात चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
सवरेपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. नऊ हा औषधशास्त्र विभागाचा पुरुष रुग्णांसाठी असलेला कक्ष आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान या वॉर्डातील स्वच्छतागृहात काही हालचाली होत असल्याचे कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांच्या निदर्शनास आले. तेथील कर्मचार्यांनी हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या कानावर घातला. सुरक्षारक्षकांनी स्वच्छतागृहात जाऊन पाहिले असता, एक सुरक्षारक्षक व रुग्णाची महिला नातेवाईक त्यांना आढळून आले. यावेळी सुरक्षारक्षकांनी सफाई कामगारास चोप देऊन त्याला बाहेर काढले. घटनास्थळी आक्षेपार्ह साहित्यही आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वॉर्डात मोठी खळबळ उडाली होती. याबाबत सुरक्षारक्षक व वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी सदर सफाई कर्मचार्याविरुद्ध अधिष्ठातांकडे रीतसर तक्रार दाखल केली. दरम्यान, बुधवारी दिवसभर सवरेपचार रुग्णालय परिसरात रात्री घडलेल्या प्रकाराची खमंग चर्चा होती.
चौकशी समिती गठित
मंगळवारी घडलेल्या या प्रकाराची अधिष्ठातांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. अस्वार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. नेताम व अधिसेविका ग्रेसी मरीयम यांचा समावेश आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.