अकोला : बियाणे कंपन्यांना लवकरच फौजदारी दणका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:10 AM2017-12-27T02:10:27+5:302017-12-27T02:12:41+5:30
अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ातील शेतकर्यांचे कापसाचे तब्बल ९0 टक्के नुकसान झाल्याने शेकडो शेतकर्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तालुका बीज निरीक्षक समितीने पाहणी करू न जिल्हा तक्रार निवारण समितीकडे अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार तक्रार निवारण समितीने जिल्हय़ातील बीटी कापूस क्षेत्राची पाहणी व तपासणी केली. त्यामध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाल्याचे समोर आल्याचा अहवाल एमआयडीसी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला आहे.
बीटी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध हा अहवाल असून, यामध्ये शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तपासणी पथकाच्या या अहवालावरून एमआयडीसी पोलिसांनी बयान नोंदविण्याचे काम हाती घेतले असून, लवकरच या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या कंपन्याविरुद्ध होणार गुन्हा दाखल!
कावेरी सीड्स सिकंदराबाद, आदित्य सीड्स सिकंदराबाद, राशी सीड्स मेडक तेलंगणा, रॅलीज सीड्स मुंबई, अजित सीड्स प्रा. लि. औरंगाबाद, वायरक्रॉप सायन्स ठाणे या सहा कंपन्यांनी हजारो शेतकर्यांची फसवणूक केल्याचा अहवाल कृषी विभागाने रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेला आहे.
सहा शेतकरी फसले!
प्राथमिक चौकशीत सहा शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे; मात्र केवळ तक्रारींसाठी सहा शेतकरी समोर आले असून, फसवणूक हजारो शेतकर्यांची झाली आहे. या हजारो शेतकर्यांचीही फसवणूक झाल्याचे निश्चित असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास यामध्ये हजारो शेतकरी तक्रारीसाठी पुढे येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
कृषी विभाग तसेच संबंधित विभागाच्या तपासणी पथकाचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला . या अहवालामध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांनी सहा शेतकर्यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही या अधिकार्यांचे बयान नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
- किशोर शेळके,
ठाणेदार, एमआयडीसी पोलीस ठाणे.