अकोला : उड्डाणपुलाच्या दोन्ही कडेला सात मीटर सर्व्हिस रोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:49 PM2019-12-30T14:49:22+5:302019-12-30T14:49:40+5:30
मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर अकोला क्रिकेट क्लबच्या प्रवेशद्वारापर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपूलाचा सर्व्हिस रोड सात मीटरचा असणार आहे.
अकोला : शहरातील उड्डाणपुलाच्या दोन्हीकडील मार्ग कसा असेल, याबाबत अजूनही अकोलेकरांमध्ये संभ्रम आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर अकोला क्रिकेट क्लबच्या प्रवेशद्वारापर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपूलाचा सर्व्हिस रोड सात मीटरचा असणार आहे.
जून १९ पासून सुरू झालेल्या उड्डाणपुलाला एकूण ४२ खांब आहेत. यापैकी ३८ खांब पूर्ण झालेआहेत. आता केवळ ४ खाबांची उभारणी शिल्लक राहिलेली आहे. ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनसाठी आणि काही ठिकाणी रॅम्पमुळे ओव्हरलोड येत असल्याने ६ खाबांच्या व्यासाचा आकार वाढविला गेला आहे. अतिरिक्त ओझे पेलण्याऱ्या या ६ खाबांचा आकार २.४ मीटरचा राहणार आहे. त्या ठिकाणचा सर्व्हिस रोड ७ मीटरचा असेल; पण निमुळता राहील. खाबांच्या व्यासामुळे हा बदल राहणार आहे. या सहा खाबांशिवाय उर्वरित ३६ खाबांचा आकार १.८ मीटर राहणार आहे. उड्डाणपूल खाबांच्या व्यासापासून दोन्ही कडेला ७ मीटरचा सर्व्हिस रोड सोडला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या शासकीय बंगल्याजवळदेखील खाबांच्या व्यासापासून ७ मीटर सर्व्हिस राहणार आहे. दोन्हीकडून सात मीटरची जागा व्यापत सर्व्हिस रोड निघणार आहे, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान क्रमांकाचे चार खाबं उभारण्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हे चारही खाबं बसस्थानकाजवळच्या अंडरपासजवळचे आहे. येथे अद्ययावत पद्धतीने पाइलची निर्मिती केली जाणार आहे. या खाबांची उभारणी होताच रॅम्पच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. कंत्राटदारास उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आॅगस्ट २०२१ मुदत देण्यात आली असली तरी त्याआधीच या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.