अकोला : स्वाइन फ्लूचे नऊ महिन्यात सात बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:18 PM2018-10-02T12:18:14+5:302018-10-02T12:20:04+5:30
अकोला: राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने अकोल्यातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत या आजाराने जिल्ह्यातील नऊ जणांचा बळी घेतला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने अकोल्यातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत या आजाराने जिल्ह्यातील नऊ जणांचा बळी घेतला आहे. आरोग्य विभागाकडून आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही या आजारावर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे उपरोक्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा श्वसनसंस्थेचा आजार असून, तो अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे हवेवाटे त्याचा झपाट्याने प्रसार होतो. गत काही वर्षांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांंमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत होते. अकोला जिल्ह्यातही गत वर्षी स्वाइन फ्लूने धुमाकूळ घालत जवळपास २० जणांचा बळी घेतला होता. यावर्षी स्वाइन फ्लूची तीव्रता कमी असली, तरी आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ६७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ असून, आतापर्यंत सात रुग्ण या आजारामुळे दगावल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.
सद्यस्थितीत १९ रुग्णांवर उपचार सुरू
पावसाळ्यात स्वाइन फ्लूची व्याप्ती वाढली असून, गत महिन्यात या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले. सद्यस्थितीत स्वाइन फ्लूच्या पॉझिटिव्ह आणि संशयित अशा एकूण १९ रुग्णांवर खासगी व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये ८ रुग्ण पॉझिटिव्ह असून, ११ रुग्ण संशयित आहेत. सर्वोपचार रुग्णालयात सात रुग्ण दाखल असून, शहरातील दोन मोठ्या खासगी इस्पितळांमध्ये १२ रुग्ण असल्याची नोंद आहे.
‘जीएमसी’मध्ये तपासणीची सुविधा नाही
पश्चिम विदर्भातील मोठे आरोग्य केंद्र असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्वाइन फ्लूची तपासणीची सुविधा नाही. स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे स्वॉब घेतल्यानंतर ते तपासणीसाठी नागपूर किंवा मुंबई येथे पाठविले जातात. यामुळे वेळ खर्ची पडतो.