ठाणेदाराच्या बदलीनंतर शिवसेनेचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:22 AM2020-10-04T11:22:33+5:302020-10-04T11:22:54+5:30
Shivsena Agitation, Gopikishan Bajoriya प्रकाश पवार यांची बदली करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील युवतीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळताना वाहतुकीची कोंडी झाल्याच्या मुद्यावरून शनिवारी शिवसेनेच्या जिल्ह्यातील दोन्ही आमदारांची पोलिसांसोबत चांगलीच जुंपली. अखेर ठाणेदार प्रकाश पवार यांची पोलिस मुख्यालात बदली करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन केल्याचा आरोप करीत, शिवसेनेने दिवसभर जय हिंद चौकात ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पवार यांच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम होते. अखेर पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी सायंकाळी पवार यांची पोलीस मुख्यालयात बदली केल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
शिवसेनेचे आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर अचानक ठाणेदार प्रकाश पवार यांनी सेनेचे ज्येष्ठ आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत वाद घातला. आंदोलनामध्ये सामील महिला पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी असभ्य वर्तन केले. त्यामुळे प्रकाश पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
- नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा आमदार
आम्ही ठाणेदार प्रकाश पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा रेटून धरल्या जाईल.
- गोपीकिशन बाजोरिया,
विधान परिषद सदस्य, शिवसेना
याप्रकरणी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार प्राप्त झाली असून, ठाणेदार प्रकाश पवार यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
- जी. श्रीधर,
जिल्हा पोलीस अधीक्षक