अकोला : शिवसेनेने राखला मलकापूर पंचायत समिती गण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:33 AM2017-12-15T01:33:27+5:302017-12-15T01:35:19+5:30
अकोला : अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील विजयी झाले. त्यामुळे मलकापूर गणाची जागा शिवसेनेने कायम राखली असून, भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील विजयी झाले. त्यामुळे मलकापूर गणाची जागा शिवसेनेने कायम राखली असून, भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.
अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाचे शिवसेनेचे सदस्य मंगेश काळे गतवर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे पंचायत समितीच्या मलकापूर-१ या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी येवता येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा या एकाच केंद्रावर मतदान घेण्यात आले. मतदानात एकूण ९६५ मतदारांपैकी ६९0 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबर रोजी अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमोल उद्धवराव पाटील आणि भारिप-बमसं पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजकुमार गोपाल गोपनारायण हे दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. दुरंगी लढतीत शिवसेनेचे अमोल पाटील यांनी ४0१ मते प्राप्त करून विजय मिळविला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारिप-बमसं पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजकुमार गोपनारायण यांना २७५ मते मिळाली. अमोल पाटील विजयी झाल्याने पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाची जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश आले असून, भारिप-बमसं पुरस्कृत उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.
प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ‘भारिप’ला अपयश!
अकोला पंचायत समिती मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राजकुमार गोपनारायण यांना भारिप-बमसंच्यावतीने पुरस्कृत करण्यात आले. तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी भारिप-बमसंच्या स्थानिक पदाधिकार्यांसह जिल्हा परिषद पदाधिकार्यांनी प्रयत्न केले; परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यात जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या भारिप-बमसंला अपयश आले.