अकोला : ‘डीपीसी’ मतदान प्रक्रियेवर शिवसेना-काँग्रेसचा आक्षेप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:41 AM2017-12-30T01:41:52+5:302017-12-30T01:42:07+5:30
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काउंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित फेरमतदानाची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काउंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित फेरमतदानाची मागणी केली.
जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत सात उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सात जागांसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. सात जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, पसंतीक्रम नोंदवून मतदारांनी मतदान केले. अकोल्यातील तीन केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मनपा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मतत्रिकेवरील अनुक्रमांक आणि मतदारांना देण्यात येणार्या ‘काउंटर स्लीप’वरील अनुक्रम एकच टाकण्यात आले असून, मतदानासाठी मतदान कक्षात एक-एक मतदारांना न सोडता एकत्रच सोडण्यात येत आहे. त्यामुळे मतदाराने (सदस्याने) कोणाला मतदान केले, हे माहीत होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग होत असल्याने, मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत, शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी फेरमतदानाची मागणी केली. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार तथा काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मतदान केंद्राला भेट देऊन, यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग होत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. मतदान प्रक्रिया नियमानुसारच घेण्यात येत आहे, तथापि गोपनीयतेचा भंग होणार नाही, यासाठी मतपत्रिकेवर अनुक्रमांकाच्या ठिकाणी स्टिकर लावण्यात येणार असून, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. यावेळी मनपातील शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, काँग्रेसचे गटनेते साजीद खान पठाण, भारिप-बमसं गटनेत्या अँड. धनश्री देव, नगरसेवक मंगेश काळे, शाहीन अंजुम महेबुब खान, पराग कांबळे व इतर नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर केले.
१५ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद ’; आज फैसला !
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात जागांसाठी १५ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये ‘सीलबंद’ झाले. शनिवारी रविवार ३0 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मतमोजणी होणार आहे.
मतदान प्रक्रियेत जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातून एका जागेसाठी महादेव गवळे व सरला मेश्राम, मनपा मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी शारदा ढोरे, शीतल गायकवाड, खान शहीन अंजुम महेबूब आणि सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी महापौर विजय अग्रवाल, राजेंद्र गिरी व मंगेश काळे, तर नगरपालिका मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून एका जागेसाठी राजेश खारोडे, मुशीरुल हक अमीरुल हक, नासीर हुसेन सफदर हुसेन, मीतेश मल्ल आणि नामाप्र स्त्री प्रवर्गातून एका जागेसाठी रेशमा अंजुम अफजलखा, गंगा चंदन, सुनीता भुजबले इत्यादी १५ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले आहे.