अकोला : एसडीओ, तहसीलदारांना आज बजावणार ‘शो-कॉज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:16 AM2017-12-27T02:16:52+5:302017-12-27T02:18:21+5:30
अकोला : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचे अहवाल आदेश देऊनही २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने जिल्हय़ातील चार उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि सातही तहसीलदारांना बुधवारी जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटीस (शो -कॉज) बजावणार आहेत.
संतोष येलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचे अहवाल आदेश देऊनही २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने जिल्हय़ातील चार उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि सातही तहसीलदारांना बुधवारी जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटीस (शो -कॉज) बजावणार आहेत.
राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे आणि तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना पीक नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, संयुक्त स्वाक्षरीसह पीक नुकसानाचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकार्यांना दिला होता. त्यानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यांत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले; परंतु जिल्हय़ातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकार्यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे तालुकानिहाय कपाशी नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांमार्फत जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला नाही.
त्यानुषंगाने कपाशी नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई झाल्याने जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार उपविभागीय अधिकार्यांसह अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तहसीलदारांना जिल्हाधिकार्यांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
नुकसानाचे पंचनामे पूर्ण!
जिल्हय़ात १ लाख ३0 हजार १२६ हेक्टर कपाशी पेरणीचे क्षेत्र असून, या सर्व क्षेत्रावरील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पंचनामे पूर्ण करण्यात आले असले, तरी पीक नुकसानाचे तालुकानिहाय अहवाल मात्र २६ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.
जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचे तालुकानिहाय अहवाल २६ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश तहसीलदार, ‘एसडीओं’ना दिला होता; परंतु पीक नुकसानाचा अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी.