अकोला ‘सिकलसेल’ रुग्णांचे रेड झोन; रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:45 PM2018-10-09T13:45:27+5:302018-10-09T13:48:46+5:30
अकोला : जिल्ह्यात ‘सिकलसेल’च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. तीन वर्षांत सिकलसेलच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अकोला जिल्हा सिकलसेल रुग्णांच्या रेड झोनमध्ये आला आहे.
- सचिन राऊत
अकोला : जिल्ह्यात ‘सिकलसेल’च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. तीन वर्षांत सिकलसेलच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अकोला जिल्हा सिकलसेल रुग्णांच्या रेड झोनमध्ये आला आहे. अकोला जिल्ह्यासाठी ही चिंताजनक बाब असून, आरोग्य विभागाने नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
आई-वडिलांपासून होणारा तसेच आनुवंशिक आजार म्हणून सिकलसेल आजाराची ओळख आहे. सिकलसेल या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील रक्तपेशी झपाट्याने तसेच प्रचंड प्रमाणात कमी होतात. रुग्णाच्या शरीरातील रक्तपेशी एका महिन्याच्या कालावधीत पूर्णत: संपण्याच्या मार्गावर असतात, त्यामुळे या गंभीर प्रकाराचा रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. २०१० पर्यंत अकोला जिल्ह्यात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या केवळ तीन हजारांच्या आत होती; मात्र आता ही संख्या २५ हजारांच्या घरात पोहोचल्याने अकोला जिल्हा सिकलसेलच्या रेड झोनमध्ये आला आहे. दोन वर्षांपूर्वी सिकलसेल रुग्णांची संख्या ११ हजार २२२ एवढी होती. आता तब्बल २५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. सिकलसेल रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात चार रुग्णालयांमध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सिकलसेलचे रुग्ण वाढले, त्यासाठी आरोग्य विभागाने चार ठिकाणी इलेक्ट्रोफोरेसिस यंत्र बसविण्यात आले असून, हे यंत्र हाताळण्यासाठी तज्ज्ञ तंत्रज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या यंत्राच्या उपचार पद्धतीमुळे अकोला जिल्ह्यातील रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे; मात्र सिकलसेल रुग्णांची वाढत असलेली संख्या जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. शासन स्तरावरून सिकलसेलच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत; मात्र आनुवंशिक आजार असलेल्या सिकलसेलवर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला प्रचंड कसरत करावी लागत आहे.
चार रुग्णालयांमध्ये उपचार
अकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व अकोट येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णालयांमध्ये सिकलसेलच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सिकलसेल हा आजार गंभीर आहे. आई-वडिलांपासून आजोबा, पणजोबांपासून होणारा हा आजार आनुवंशिक आहे. या आजारामुळे रुग्णांची वयोमर्यादा केवळ ४५ ते ४८ वर्षे एवढीच राहते. रुग्णांच्या शरीरातील रक्तपेशी दर महिन्याला प्रचंड प्रमाणात कमी होत असल्याने या आजाराच्या रुग्णांचे वय हे २० ते ३० वर्षांनी घटत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.