अकोला येथे पोलीस आयुक्तालय होण्याचे संकेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 02:41 AM2016-10-03T02:41:42+5:302016-10-03T02:41:42+5:30
मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती.
सचिन राऊत
अकोला, दि. 0२- शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आता पोलीस आयुक्तालयच पर्याय असल्याने अकोला पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना गत दोन दिवसांपासून मुंबईत डेरेदाखल होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरच पोलीस अधीक्षक मुंबईत गेले होते, त्यानंतर त्यांच्यात पोलीस आयुक् तालयाच्या मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यास पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हय़ातील गुन्हेगारीवर विशेषत: चोर्या, घरफोड्या, खंडणीसारखे गुन्हे रो खण्यासाठी पोलीस आयुक्तालय एकमेव पर्याय असून त्यानंतरच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. जिल्हय़ातील २३ पोलीस स्टेशनचा कारभार हाकण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सध्या असलेले मनुष्यबळ प्रचंड अपुरे आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे पालकत्व असलेला जिल्हा एवढेच नव्हे तर खासदार आणि जिल्हय़ातील चार आमदार भाजपाचे आहेत; मात्र त्यानंतरही पोलीस आयुक्तालय वर्षानुवर्षापासून र खडलेले आहे. पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना चांगलेच लढा देत आहेत; मात्र त्यांचा लढा एकाकी पडत असून राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे वास्तव आहे. खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या शहरातीलच पोलीस आयुक्तालयाच्या चेंडूची वारंवार टोलवा-टोलवी सुरू असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला पोलीस आयुक्तालयासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना दोन दिवसांपूर्वी तातडीने मुंबईत बोलावले. पोलीस आयुक्तालयाच्या मुद्दय़ांवर मु ख्यमंत्र्यांना आवश्यक असलेले दस्तावेज आणि माहिती पोलीस अधीक्षकांनी पुरविली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या मुद्दय़ावर पुन्हा बैठक घेतल्याने आयुक्तालय निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे.
निकष पूर्ण; मात्र आयुक्तालय होईना
पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण असतानाही अकोल्यातील आयुक्तालय घोडे अडलेले आहे. डिसेंबर २0१५ मध्ये अकोला शहराचे पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्याचे आश्वासन तत्कालीन गृहराज्यमंत्री व आताचे कॅॅबिनेट मंत्री राम शिंदे यांनी दिले; मात्र त्यावरही एक वर्ष उलटले.
पिंपरी चिंचवड, अकोल्याचा प्रस्ताव सोबतच
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय डिसेंबरमध्ये कार्यान्वित होण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना तातडीने मुंबईत बोलावून बैठक घेतल्याने पिंपरी चिंचवडसोबतच अकोला पोलीस आयुक्तालय कार्यान्वित होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दोन्ही प्रस्ताव एकाचवेळी तयार असून अर्थखात्याकडे आहेत.