Akola: धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट; पाणीटंचाईचे ओढवणार संकट? मान्सून लांबल्याने वाढली चिंता
By रवी दामोदर | Published: June 17, 2023 06:48 PM2023-06-17T18:48:02+5:302023-06-17T18:49:27+5:30
Akola: अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस लांबला आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती आहे.
- रवी दामोदर
अकोला - अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस लांबला आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ २६ टक्केच जलसाठा राहिला असून, इतर धरणांच्या पातळीतही कमालीची घट झाली आहे. त्यातच उन्हाचा पारा ४२ अंशाच्या खाली येत नसल्याने बाष्पीभवन वाढले आहे.
जिल्ह्यातील उन्हाचे चटके कमी होत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. त्यातच उन्हाच्या तीव्रतेने धरणांतील जलसाठ्यात होणारी घट चिंता वाढवणारी आहे. काटेपूर्णा धरणात केवळ २६ टक्केच साठा उपलब्ध आहे. तर इतर धरणाची स्थितीही तशीच आहे. पाऊस पुढे लांबल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे टेन्शन वाढणार आहे. आगामी पाणीटंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता त्यानुसार, नियोजन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कमी होईना
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात घट झाल्याचे जाणवले. मात्र, तेव्हापासून तापमानात सतत वाढ होत असून, पारा ४२ अंशावरच आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणामध्ये बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने धरणातील जलसाठ्यात कमालीची घट होत आहे.
नदी, नाले कोरडे, उपाययोजना गरजेची
जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. उन्हाच्या तीव्रतेने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. तसेच नदी, नाले कोरडे झाल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन पाणी पुरवठ्यासंबंधी उपाययोजना आखण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असा आहे जलसाठा
प्रकल्पाचे नाव आजचा उपयुक्त जलसाठा टक्केवारी
काटेपूर्णा २३.२९ २६.९७
वान प्रकल्प ३०.१९ ३६.८४
मोर्णा १६.०९ ३८.८२
निर्गुना ६.५० २२.५३
उमा १.१० ९.४३
एकूण लघू २९.०४ ३०.०२