अकाेला जिल्ह्यातील पाेलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 10:34 AM2021-07-27T10:34:51+5:302021-07-27T10:35:06+5:30
Police officers transfers : विलंब झाला असला तरी ३० जुलैपर्यंत बदल्या करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
अकाेला : जिल्ह्यातील पाेलीस दलात चार वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पाेलीस अधिकाऱ्यांच्या या आठवड्यात बदल्या हाेण्याची दाट शक्यता आहे. काेविडमुळे यावर्षी जनरल बदल्यांना बराच वेळ झाला आहे. मात्र, आता ३० जुलैपर्यंत या बदल्यांची यादी बाहेर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
एका जिल्ह्यात चार वर्षांचा, तर परिक्षेत्रामध्ये आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या पाेलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक हे बदलीसाठी पात्र आहेत. कोविड-१९मुळे यंदा सार्वत्रिक बदल्यांना विलंब झाला असला तरी ३० जुलैपर्यंत बदल्या करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तत्पूर्वी बदलीच्या ठिकाणाचे चॉइस मागितल्याने ज्यांचा ज्यांचा जिल्ह्यात चार वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण झाला आहे अशांनी बदलीसाठी विनंती केली आहे, तर काैटुंबिक अडचणी, मुलांचे शिक्षण, तसेच विविध अडचणींमुळे पाेलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात येते. यासाठी काही अधिकाऱ्यांनी काेविडच्या संकटामुळे एक वर्ष मुदतवाढ देण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एखाद वर्षतरी जिल्ह्यात मुदतवाढ मिळावी म्हणून काही पोलीस अधिकाऱ्यांनी अर्ज केले आहेत.
अकाेला नकाे रे बाबा
अकाेला जिल्हा पाेलीस दलातील अनेक माेठ्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या ठिकाणी काही पाेलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या हाेत्या. मात्र, त्यांनी परस्परच बदली करून घेतल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अकाेल्यात सध्या आकाेटसारखे संवेदनशील शहर व तालुक्यात उपविभागीय पाेलीस अधिकारी यायला तयार नाहीत, तर बाळापूर तालुक्याचा प्रभारही पाेलीस निरीक्षकाकडे देण्यात आला आहे. यासह पाेलीस अधीक्षक कार्यालयातील उपअधीक्षकांचे पदही रिक्त आहे. त्यामुळे अकाेला नकाे रे बाबा अशीच विनंती पाेलीस अधिकारी करीत असल्याची माहिती आहे.