सुपर स्पेशालिटीसाठी शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 02:25 PM2020-01-12T14:25:25+5:302020-01-12T14:25:59+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला.
अकोला: सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या पद निर्मितीचा तिढा सोडविण्यास प्राधान्य असून, लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिले. सोबतच सर्वोपचार रुग्णालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश दिले असून, त्याची सुरुवात १२ जानेवारीपासून होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागातील विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा आढावा घेताना खाटांची संख्या, वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा तसेच इमारतीच्या बांधकामासंदर्भात माहिती घेतली.
दरम्यान, पद निर्मितीला मंजुरीचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. यासोबतच त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाला धारेवर धरले असून, महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश दिले.
या अभियानाची सुरुवात १२ जानेवारी रोजीपासून होणार आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर अर्चना मसने यांच्यासह सर्व नगरसेवकांना सूचना दिली. कार्यक्रमात सर्वच आमदार, मनपा आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याबाबत सूचना दिल्या.
आढावा बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जितेंद्र वाघ, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कु लवाल, प्रशासकीय अधिकारी संजीव शर्मा, डॉ. श्यामकुमार शिरसाम व डॉ. दिनेश नैताम यांची उपस्थिती होती.
‘जीएमसी’च्या इमारतीला ‘व्हाइट वॉश’
सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतींची रंगरंगोटी करण्याची मागणी आढावा बैठकीदरम्यान जीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आली. या मागणीला मान्यता देत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतींना पांढरा रंग देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिली.
दलालांच्या मुद्यावर धरले धारेवर
आरोग्य विभागातील विविध विकास कामांचा आढावा घेत असताना आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वोपचार रुग्णालयातील दलालांचा मुद्दा उपस्थित केला. शिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून दलालांची नावे उघड करण्यात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अधिष्ठातांना धारेवर धरत दलालांची नावे उघड करण्याबाबत सूचना दिल्या.