‘सुपर स्पेशालिटी’ पदांच्या प्रतीक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:28 AM2020-08-08T10:28:28+5:302020-08-08T10:29:09+5:30
आवश्यक पद निर्मितीच्या बाबतीत मात्र शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
अकोला : राज्यात अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. चारही ठिकाणच्या हॉस्पिटलच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आहेत; पण चारही रुग्णालयांच्या आवश्यक पदांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद््घाटनाची घाई करण्यात आली होती; मात्र त्यासाठी आवश्यक पद निर्मितीच्या बाबतीत मात्र शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. चारही हॉस्पिटलच्या पद मंजुरीचा आराखडा संचालकांकडे पाठविण्यात आला, तरी त्यांना अद्याही मंजुरी मिळाली नाही. मध्यंतरी केंद्र शासनाच्या पत्रानुसार, अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद््घाटन मार्च-२०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली होती; मात्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्यासाठी मनुष्यबळ निर्मितीकडे शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जीएमसीच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे प्राप्त झालेले आहेत. शासनाकडे आवश्यक पदांसाठी पाठपुरावा सुरू आहे.
वीज पुरवठाही मिळेना!
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी एमआरआय, सीटी स्कॅनसह इतर अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे येऊन दोन वर्षांचा कालावधी झाला; पण अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला अद्यापही वीज पुरवठा मिळालेला नाही. त्यामुळे महागड्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन रखडले आहे. अशीच काहीशी स्थिती राज्यातील इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आहे.