अकोला : दोघांचा संशयास्पद मृत्यू; विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:03 PM2020-04-06T16:03:59+5:302020-04-06T16:04:07+5:30
शेख सउद शेख रमजान आणि फारुख केरु जमुरेवाले असे दोन्ही मृतकांची नावे असून त्यांनी विषारी दारु पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आकोट फैल पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अकोला : आकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय नगर येथील रहिवासी दोन जनांचा सोमवारी दुपारी अचानकच मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख सउद शेख रमजान आणि फारुख केरु जमुरेवाले असे दोन्ही मृतकांची नावे असून त्यांनी विषारी दारु पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आकोट फैल पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले असून याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्युचे नेमके कारण समोर येणार आहे.
आकोट फैलातील संजय नगर येथील रहिवासी शेख सउद शेख रमजान (26)आणि फारुख केरु जमुरेवाले (२७) या दोघांनी याच परिसरात चालविण्यात येत असलेल्या गावठी दारुच्या भट्टयावरील दारु पिल्याची चर्चा आहे. यामधील शेख सउद शेख रमजान सोमवारी दुपारी घरी आल्यानंतर त्याला अंगात जळजळ होत असल्याने थंड पाण्याने आंघोळ केली. मात्र त्यानंतर काही वेळताच त्याचा मृत्यू झाला. याच परिसरातहील रहिवासी असलेला त्याचा मीत्र फारुख केरु जमुरेवाले यालाही अशा प्रकारच्या वेदना झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आकोट फैल पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली. मात्र दोघांच्याही मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान या दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उघडकीस येणार आहे. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी सद्या आकस्मीक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.
कोरोनाचीही प्रचंड अफवा
दरम्यान सदर दोन्ही जनांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गजन्य विषानुमुळेही झाल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भितीचे वातावरणही निर्माण झाले होते. या अफवेमुळे पोलिसांच्याही मनात संशय आल्याने त्यांनी सदर प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तपास सुरु केला आहे. मात्र या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण आता उत्तरिय तपासणीच्या अहवालानंतरच समोर येणार आहे.