अकोला संघाला बॉक्सिंगमध्ये सर्वसाधारण विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 02:19 PM2019-11-18T14:19:29+5:302019-11-18T14:26:25+5:30
अकोला संघाने २६ गुणांसह ४ सुवर्ण व १ कांस्यपदक पटकावत राज्यात प्रथम स्थानासह अजिंक्यपद मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: १९ व्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद अकोला शहर संघाने पटकावले. अकोला संघाने २६ गुणांसह ४ सुवर्ण व १ कांस्यपदक पटकावत राज्यात प्रथम स्थानासह अजिंक्यपद मिळविले. २१ अंकासह मुंबई उपविजेता आणि ११ अंकासह पुणे संघाने तृतीय स्थान मिळविले.
बेस्ट चॅलेंजरचा पुरस्कार पिंपरी चिंचवडची नीतू सुतार हिने पटकावला. बेस्ट प्रमोसिंग बॉक्सरचा खिताब मुंबईच्या सिमरन हिने मिळविला. बेस्ट रेफरी ठाण्याच्या रिना माने ठरल्या. बेस्ट जज विनोद राठोड ठरले. बेस्ट कोच पुरस्कार विकास काटे यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट बॉक्सर अकोल्याची दिया बचे ठरली.
स्पर्धेत ४८ किलो वजनगटात दिया बचे, ५१ किलो संगीता रुमाले अकोला शहर, ५४ किलो तेजस्विनी औरंगाबाद, ५७ किलो लक्ष्मी मेहरा पुणे, ६० किलो पूनम कैथवास अकोला शहर, ६४ किलो सिमरन मुंबई जिल्हा, ६९ किलो भाग्यश्री पुरोहित मुंबई जिल्हा, ७५ किलो मनीषा ओझा मुंबई जिल्हा, ८१ किलो ऋतुजा देवकर मुंबई जिल्हा, ८१ किलोच्या वर शायान पठाण अकोला शहर या खेळाडूंनी सुवर्णपदकासह महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निवासी जिल्हा अधिकारी प्रा. संजय खडसे, माजी सहायक जिल्हा अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, पंकज कोठारी, प्रा. गणेश बोरकर, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, डॉ. अमोल व राधिका केळकर, गुरुमित गोसल व अधीक्षक अभियंता नरेंद्र चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक आणि पदक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांची निवड केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात झाली असल्याची घोषणा स्पर्धा संयोजक डॉ. सतीशचंद्र भट्ट यांनी यावेळी सांगितले. मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.