अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:35+5:302021-04-17T04:17:35+5:30
पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर लाचखोरी प्रकरणात तहसीलदार सहआरोपी अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास पाच हजार ...
पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर लाचखोरी प्रकरणात तहसीलदार सहआरोपी
अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास पाच हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून तपास केल्यानंतर याप्रकरणात अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याने त्यांना अकोला एसीबीने शुक्रवारी सहआरोपी केले. लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती.
अकोला तहसील कार्यालयातील अन्न नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला नीलेश भास्कर कळसकर (वय ३२) याने बोरगाव मंजू येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी त्याच्या दुकानातून कोरोना काळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी १० टक्के याप्रमाणे म्हणजे पाच हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर यास अटक केली होती. त्यानंतर कळसकर पोलीस कोठडीत असताना कसून चौकशी केली असता या प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे या लाचखोरी प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू होती.