अकोल्याचा पारा सलग तिसऱ्या दिवशी ४५ पार; उकाड्याने अकोलेकर हैराण
By Atul.jaiswal | Published: May 25, 2024 07:33 PM2024-05-25T19:33:40+5:302024-05-25T19:34:27+5:30
अकोला जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी तामनाचा पार ४५ अंश सेल्सियसच्या पार असल्याचे पाहायला मिळालं.
अकोला : आठवडाभरापासून सुरु असलेली उष्णतेची लाट कायम असून, शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी अकोल्याचे कमाल तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदविले गेले. शुक्रवारी या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची (४५.८ अंश) नोंद झाल्यानंतर शनिवारी किंचित घसरण होऊन पारा ४५.६ अंश सेल्सीयसवर आला. उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही होत असून, उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत.रविवार, १९ मेपासून तापमानाचा ग्राफ चढण्यास सुरुवात झाली. गुरुवार, २३ मे रोजी नवतपा सुरु झाल्यानंतर या उन्हाळ्यात अकोल्याचा पारा प्रथमच ४५.५ अंशांवर गेला होता. शुक्रवारी या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाल्यानंतर शनिवारी उन्ह-सावलीचा खेळ पहावयास मिळाला, परंतु तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक नोंदविले गेले.
वैशाख वणव्यासारखी स्थिती असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला. एरव्ही गजबजलेल्या बाजारपेठांमध्येही भर दिवसा फारशी वर्दळ नव्हती.
विदर्भात सर्वाधिक उष्ण
सलग तिसऱ्या दिवशी अकोला हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. अकोल्यानंतर यवतमाळ (४५.५), अमरावती (४४.४ ), ब्र्रह्मपूरी व वर्धा (४४) अंश, वाशिम (४३.८) व चंद्रपूर येथे (४३.४) ही शहरे अधिक तापमानाची ठरली.