अकोला : किन्नर संमेलनामध्ये होतेय नवीन नात्यांची गुंफण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:40 AM2018-02-06T01:40:53+5:302018-02-06T01:48:31+5:30
अकोला : दामले चौकातील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहामध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनामध्ये देशभरातील कानाकोपर्यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध प्रांतातून आलेल्या किन्नरांमध्ये विचारांच्या आदानप्रदानासह नवीन नात्यांची गुंफण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दामले चौकातील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहामध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनामध्ये देशभरातील कानाकोपर्यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध प्रांतातून आलेल्या किन्नरांमध्ये विचारांच्या आदानप्रदानासह नवीन नात्यांची गुंफण होत आहे. सोमवारी संमेलनात बहीण मानण्याचा कार्यक्रम पार पडला. यात अकोल्याची आशाबाई, सिमरन (अम्माजी), बर्हाणपूरच्या शकीलाबाई, बालाघाटची रूपा नायक यांना बहिणींच्या नात्याने स्वीकारले.
संमेलनामध्ये मंगळवारी शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सुरुवात मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहातून होईल, पवित्र गंगाजलाने भरलेल्या कलशाची यात्रा दामले चौक, अकोट स्टँड, टिळक रोड, कोतवाली चौक, गांधी रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, रफी अहमद किदवई मार्गाने निघणार असून, मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात शोभायात्रेचा समारोप होईल. किन्नर संमेलनामध्ये देशातील सर्वच राज्यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये विचार, संस्कृतीचे आदानप्रदान होत आहे. संमेलनामध्ये मातेची अखंड ज्योत प्रज्वलित असून, सर्व पंथाचे, धर्माचे लोक या ठिकाणी अखंड ज्योतीचे दर्शन घेऊ शकतात. सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत दर्शनासाठी वेळ देण्यात आली आहे.
किन्नर कल्याण बोर्डाच्या स्थापनेमुळे आनंद
राज्य शासनाने किन्नर कल्याण बोर्डाची स्थापना केल्यामुळे संमेलनामध्ये सहभागी झालेल्या किन्नर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संमेलनामध्ये राज्य शासनाच्या अभिनंदनाचा प्रस्तावदेखील किन्नर बांधवांनी पारित केला.
पालकमंत्र्यांनी साधला संवाद
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी किन्नर संमेलन स्थळाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी किन्नरांच्या समस्याबाबत माहिती घेतली. संमेलनाच्या आयोजीत विविध कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. अशोक ओळंबे, महापौर विजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती.