अवघ्या तीन हजार रुपयांसाठी अकोलेकर तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:55 PM2018-11-09T13:55:43+5:302018-11-09T13:55:58+5:30

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे.

Akola thirsty for only 3 thousand rupees | अवघ्या तीन हजार रुपयांसाठी अकोलेकर तहानलेले

अवघ्या तीन हजार रुपयांसाठी अकोलेकर तहानलेले

Next

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे. हा मार्ग ओलांडण्यासाठी भूमिगत जलवाहिनीचा पर्याय असून, रेल्वे प्रशासनाच्या परवागीसाठी आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे शुल्कापोटी तीन हजार रुपये नसल्यामुळे की काय, ‘अमृत’च्या कामाला खीळ बसली आहे. परिणामी, अवघ्या तीन हजार रुपयांसाठी शहरवासी तहानलेले असल्याचे चित्र समोर आले आहे.
‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. त्यामध्ये जलकुंभाची उभारणी करण्यासह नागरिकांच्या घरापर्यंत जलवाहिनीचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगर भागात जलवाहिनीचे जाळे नाही. हातपंपांच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने ते पिण्यायोग्य नसल्याची परिस्थिती आहे. अशा स्थितीत नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते. ‘अमृत’च्या माध्यमातून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असल्याने प्रभाग तीनमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. यादरम्यान, रेल्वे मार्ग ओलांडून भूमिगत पद्धतीने जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तीन हजार रुपये शुल्क जमा करावे लागते. अशाप्रमाणे किमान पाच ते सहा ठिकाणी भूमिगत जलवाहिनीचे जाळे टाकावे लागेल. सदर कामासाठी मनपा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी जलप्रदाय विभागात सेवानिवृत्त शाखा अभियंता डी. के. राऊत यांच्याकडे जबाबदारी दिली होती; परंतु ‘अमृत’च्या कामात शुल्क भरण्याची तरतूद नसल्याची सबब पुढे करून आजपर्यंतही रेल्वे प्रशासनाकडे अर्ज सादर करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, प्रभाग तीनमधील नागरिकांपर्यंत जलवाहिनीचे जाळे पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अर्ज सादर करण्यास विलंब
भूमिगत पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे अर्ज सादर केल्यानंतर परवानगीसाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सदर अर्ज सादर करण्यासाठी जलप्रदाय विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे चित्र आहे.

 

Web Title: Akola thirsty for only 3 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.