अकोला : ‘वखार’च्या गोदामातील हजारो क्विंटल धान्य खराब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:36 AM2017-12-15T01:36:22+5:302017-12-15T01:40:27+5:30
अकोला : शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून जिल्हाधिकार्यांच्या मागणीनुसार पुरवठा होणारा तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गहू खराब झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून जिल्हाधिकार्यांच्या मागणीनुसार पुरवठा होणारा तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गहू खराब झाला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी निगमच्या तीन अधिकार्यांच्या पथकाने गुरुवारी गोदामात तपासणी केली, तसेच गहू, तांदळाच्या साठय़ात तफावत असल्याच्या कारणावरून गेल्या दोन महिन्यांपासून धान्य पुरवठाही बंद करण्यात आला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी राज्य शासन भारतीय खाद्य निगमकडून धान्याची खरेदी करते. धान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने अकोला एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेत तेथे साठा केला आहे. जिल्हाधिकार्यांनी मागणी केल्यानुसार गहू, तांदळाचा पुरवठा वखारच्या गोदामातून केला जातो. गेल्या दोन वर्षात भारतीय खाद्य निगमने वखारच्या गोदामात साठा केलेल्या गहू, तांदळाच्या साठय़ात मोठी तफावत असल्याची माहिती आहे. उपलब्ध साठय़ापैकी मोठय़ा प्रमाणात धान्य खराब झाले. ते धान्य जिल्हाधिकार्यांच्या शासकीय गोदामांना तसेच लाभार्थींना वाटप करण्याची तयारी राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाने केली. त्यापूर्वीच धान्याच्या गुणवत्तेची तसेच गोदामातील साठय़ाची तपासणी करण्यासाठी खाद्य निगमच्या तीन अधिकार्यांचा समावेश असलेल्या पथकाने वखारच्या गोदामात धडक दिली. खराब झालेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गव्हाची पाहणी पथकाने केली. तपासणी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाणार आहे.
दोन महिन्यांपासून धान्याचा पुरवठा बंद
भारतीय खाद्य निगमने धान्य साठा करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या राज्य वखार महामंडळाच्या गोदामात गेल्या दोन वर्षांपासून साठा केलेला गहू आणि तांदूळ कमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे या गोदामातील साठा शून्य करून धान्याचा हिशेब जुळवण्याचे पत्र निगमने दोन महिन्यांपूर्वीच वखार महामंडळाला दिले आहे. तेव्हापासून भारतीय खाद्य निगमने या गोदामात धान्याचा पुरवठाही थांबवला. त्यामुळे खराब झालेल्या धान्य साठय़ाची किंमत आता वखार महामंडळाकडून वसूल करण्याची तयारी खाद्य निगमने केली आहे.
वखारच्या दुर्लक्षामुळे धान्य खराब
खाद्य निगमकडून वखार महामंडळाला गोदामात धान्य सुस्थितीत ठेवण्याचे भाडे दिले जाते. ते खराब किंवा अपहार झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वखार महामंडळावर आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तांदूळ व गहू खराब झाल्याने त्याची नुकसानभरपाई आता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून वसूल होण्याची शक्यता आहे.
गोदामात दोन महिन्यांपासून शासकीय धान्याची आवक बंद आहे. तांदळाच्या साठय़ाचा तपासणी अहवाल खाद्य निगमच्या पथकाकडून वरिष्ठांना सादर होईल, त्यानंतर त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जाणार आहे.
- एस.जी.ढवळे,
भांडार व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, अकोला.
-