अकोला: शिक्षण विभागाची परवानगी न घेताच शाळेचे स्थानांतरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:53 PM2018-03-29T14:53:04+5:302018-03-29T14:53:04+5:30
अकोला: मनकर्णा प्लॉट परिसरातील डॉ. के.ए. अहमद उर्दू शाळेच्या प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी न घेताच, शाळा तीनदा स्थानांतरित करून नियमाचे उल्लंघन केले आहे.
अकोला: मनकर्णा प्लॉट परिसरातील डॉ. के.ए. अहमद उर्दू शाळेच्या प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी न घेताच, शाळा तीनदा स्थानांतरित करून नियमाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणाची तक्रार शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे झाल्यानंतर, त्यांनी पथकाद्वारे शाळेची तपासणी करून शाळेसंबधी महत्त्वाची कागदपत्रे आणि संबंधित शिक्षण संस्थेला खुलासा सादर करण्यास बजावले आहे.
डॉ. के.ए. अहमद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ही सुरुवातीला गवळीपुऱ्यातील साबेरा मंजिल नामक निवासस्थानी सुरू करण्यात आली होती; परंतु काही महिन्यातच शासकीय तंत्रनिकेतन शाळेसमोरील मनकर्णा प्लॉट परिसरातील अरेबीविला या निवासस्थानी ही शाळा स्थानांतरित करण्यात आली. शाळा स्थानांतरित करायची असेल तर शासन नियमानुसार शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते; परंतु संस्थाचालकाने शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना अंधारात ठेवून आणि कोणतीही परवानगी न घेता, ही शाळा दुसºयांदा गजाला कॉम्पलेक्स, मनकर्णा प्लॉट येथे स्थानांतरित केली. यावेळीही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. गजाला कॉम्प्लेक्सची इमारत अनधिकृत असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गजाला कॉम्प्लेक्सचा काही भाग पाडून टाकला. त्यामुळे तिसºयांदा डॉ. के.ए. अहमद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील महापालिकेच्या भूखंडावर स्थानांतरित करण्यात आली. तेव्हाही शिक्षण विभागाच्या परवानगीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यासंबंधीची तक्रार शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे करण्यात आल्यानंतर, त्यांनी मंगळवारी दोन अधिकाºयांना शाळेत पाठवून तपासणी करून महत्त्वाची कागदपत्रे मागविली आहेत आणि तातडीने खुलासा सादर करण्यास बजावले आहे. त्यामुळे आता या शाळेवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग काय कारवाई करतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी नाकारला होता निधी
शिक्षण विभागाकडून अल्पसंख्यक शाळांना भौतिक सुविधांसाठी २ लाखांचा निधी देण्यात येतो. डॉ. के. ए. अहमद उर्दू शाळेलाही २ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता; परंतु ही शाळा निवासस्थानी सुरू असल्याची आणि विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देत नसल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी या शाळेचा २ लाख रुपयांचा धनादेश थांबविला होता, हे विशेष.
डॉ. के.ए.अहमद उर्दू शाळेने शिक्षण विभागाची परवानगी घेता, तीन वेळा शाळा स्थानांतरित केली. हा नियमाचा भंग आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची होरपळ झाली. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळेची तपासणी करून खुलासा मागविला आहे. नियमानुसार शाळेवर कारवाई होईल.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी