पिण्याचे पाणी मिळेना, उपाययोजना होइना; पाणीटंचाई निवारणाचा आराखडा कागदावरच
By संतोष येलकर | Published: May 27, 2023 04:00 PM2023-05-27T16:00:22+5:302023-05-27T16:00:51+5:30
जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ८३ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली.
अकोला - कडाक्याच्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाइचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असतानाच, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना मात्र होत नसल्याचे वास्तव आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी एप्रिल ते जून या कालावधीसाठी पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या या आराखड्यात जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, उपाययोजनांच्या कामांसाठी ६४ लाख ४२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. परंतु अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध गावांत ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करीत पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त गावांत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यातील उपाययोजनांची कोणतीही कामे मात्र सुरू नसल्याचे वास्तव आहे.
कृती आराखड्यातील प्रस्तावित गावे आणि उपाययोजना !
- तालुका गावे उपाययोजना
- अकोला ०६ ०६
- बार्शिटाकळी ०८ ०८
- बाळापूर ११ १४
- पातूर १६ १६
- मूर्तिजापूर ०५ ०५
- अकोट १६ १८
- तेल्हारा १६ १६
एकही उपाययोजनेचे काम नाही सुरू !
जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ८३ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यामध्ये ७२ विहिरींचे अधिग्रहण, २ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, ४ विंधन विहीर आणि ५ कूपनलिकांचा समावेश आहे. परंतु या उपाययोजनांपैकी एकही उपाययोजनेचे काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचे चित्र आहे.
झिरा, व्हाॅल्व्हच्या पाण्यावर भागविली जाते तहान !
जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये कवठा, कोळासा या गावांसह अन्य काही गावांमध्ये नदीपात्रातील झिरा तसेच गावाबाहेरील जलवाहिनीवरील व्हॅल्व्हच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. त्यानुषंगाने तापत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.