Akola: सनदी लेखापाल यांचे दोन दिवसीय संमेलन शेगावात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येणार
By Atul.jaiswal | Published: August 19, 2023 08:25 PM2023-08-19T20:25:51+5:302023-08-19T20:27:11+5:30
Akola: शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला - सनदी लेखापालांना बदलत्या आर्थिक घडामोडींची माहिती व्हावी, त्यांच्या व्यावसायिक व करिअरविषयक ज्ञानात मोलाची भर पडावी या हेतूने वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अकोला व अमरावती शाखेच्या वतीने शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची उपस्थिती लाभणार असून सनदी लेखापालांच्या असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्षांसोबतच ख्यातनाम वक्ते या संमेलनात उपस्थित राहणार असल्याची माहिती सनदी लेखापाल असोसिएशन अकोला शाखेच्या अध्यक्ष सीए सीमा बाहेती यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अमरावती विभागातील समस्त सनदी लेखापालांसाठी आयोजित या संमेलनाचा प्रारंभ २५ ऑगस्ट रोजी भागवत कराड यांच्या हस्ते तसेच सनदी लेखापाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए रणजित अग्रवाल, आयोजन समितीतील सनदी लेखापालांच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए अर्पित काबरा, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष हितेश कोमल, सचिव सीए सौरभ अजमेरा, कोषाध्यक्ष सीए केतन सैया आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर तांत्रिक व्याख्यानांचा प्रारंभ करण्यात येऊन या व्याख्यानाचे पहिले पुष्प सीए सुनील गभावाला हे गुंफणार असून जीएसटी संदर्भातील लवाद कसा हाताळावा यावर ते व्याख्यान सादर करणार आहेत.
दुपारी सनदी लेखापाल संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे हे सीए व्यवसायाचे वर्तमान चित्र, जागतिक संधी व नवीन टप्पे यावर व्याख्यान सादर करणार आहेत. तिसरे पुष्प सीए विमल पुनमिया हे गुंफणार आहेत. द्वितीय दिनाचे प्रथम पुष्प डॉ. सीए गिरीश आहुजा हे भांडवली लाभांमधील गंभीर मुद्दे या विषयावर गुंफणार आहेत. यानंतर सनदी लेखापाल संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जम्बुसरिया हे विश्वस्त संस्था यावर व्याख्यान सादर करणार आहेत. दुपारी स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज हे भारतीय संस्कृतीमध्ये व्यवस्थापन शास्त्र या विषयावर आपले व्याख्यान सादर करणार आहेत. पत्रकार परिषदेला सचिव सीए सुमित आलिमचंदानी, सीए प्रमोद भंडारी, व सीए रमेश चौधरी उपस्थित होते.