Akola Unlock : निर्बंध शिथिल होताच उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 07:43 PM2021-06-01T19:43:38+5:302021-06-01T19:44:51+5:30
Akola Unlock: सूट मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे.
अकोला : कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर मंगळवारपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे अकोलेकर घराबाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली तर रस्त्यांवर वाहनांची कोंडी देखील झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले.
लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही; मात्र कोरोनाचा वारंवार होणारा उद्रेक जिल्ह्याला लॉकडाऊनकडे ढकलतो. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा मोठा विस्फोट झाला. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची भयावह संख्या समोर आली. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्याने आता दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे मंगळवारपासून जिल्ह्यात दुपारी २ पर्यंत अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक व्यावसायिकांना सूट मिळाली. जिल्ह्यातील व्यवहार सुरू झाल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बाजारातील तुडूंब गर्दीमुळे प्रशासनाला मात्र कोरोना वाढण्याची चिंता लागली आहे.
ही सूट मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्याची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी बाजार पेठेत खरेदीसाठी मोठी वर्दळ वाढली. रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली होती. शहरात २ नंतरही मुख्य बाजारासह रस्त्यांवर गर्दी कायम होती.