अकोला अर्बन बँक निवडणूक;खंडवा-इंदूर येथील सभासदांच्या यादीवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:25 PM2019-11-17T12:25:12+5:302019-11-17T12:25:17+5:30
बँकेचे सभासद पुरुषोत्तम त्र्यंबक व्यास यांनी खंडवा-इंदूर येथील सभासदांच्या यादीवर आक्षेप नोंदवून बँकेच्या अध्यक्षांकडे तक्रार नोंदविली आहे.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दि. अकोला अर्बन को-आॅपरेटिव्ह, मल्टीस्टेट शेड्युल बँकेच्या २०२०-२०२५ च्या संचालक मंडळाची निवडणूक लागली असून, तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, बँकेचे सभासद पुरुषोत्तम त्र्यंबक व्यास यांनी खंडवा-इंदूर येथील सभासदांच्या यादीवर आक्षेप नोंदवून बँकेच्या अध्यक्षांकडे तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दि. अकोला अर्बन को-आॅपरेटिव्ह, मल्टीस्टेट शेड्युल बँकेच्या २०२०-२०२५ च्या संचालकीय मंडळासाठी आगामी जानेवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. त्याकरिता तोष्णीवाल ले-आउटमधील जनकल्याण या मुख्य कार्यालयात तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या सभासदांचा यामध्ये समावेश असून, काही बदल वा आक्षेपाबाबत सुधारणा मागविल्या आहेत.
त्यावर बँकेचे सभासद पुरुषोत्तम त्र्यंबक यांनी पुन्हा खंडवा आणि इंदूरच्या सभासद यादीवर आक्षेप घेत ही यादी अद्ययावत नसल्याचा आरोप केला आहे. दोन्ही ठिकाणच्या सभासदांची नावे असलेली यादी येथे नाही. ती तातडीने येथे लावण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बँकेच्या सभासदांना अंधारात ठेवून तसेच नियमांचे उल्लंघन करून ही प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यासंबंधीचे पत्रदेखील बँकेचे विद्यमान अध्यक्ष बाबा ऊर्फ नरेंद्र पाठक यांना देण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत ही यादी अद्ययावत केली जाणार असली तरी अनेकांना याबाबत माहिती नसल्याचेही व्यास यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी अध्यक्ष पाठक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बँकेचे सीईओ शर्मा यांच्याशी संवाद साधण्याचे सांगितले.
गत काही निवडणुकांपासून व्यास यांनी एकच मुद्दा रेटून तक्रारी केल्या आहेत. याबाबत त्यांना सभासदांची यादीदेखील देण्यात आली आहे. संचालकीय मंडळाची निवडणूक कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीनेच होत आहे.
-सुभाष शर्मा,
सीईओ, दि. अकोला अर्बन बँक, अकोला.