अंधत्वावर मात करणारी दृष्टी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:15 AM2017-08-07T02:15:20+5:302017-08-07T02:17:57+5:30
प्रज्ञाचक्षूंनी तयार केल्या आठ हजार राख्या!
राम देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : येथील ‘क्षितिज’ अंध-अपंग विरंगुळा व पुनर्वसन केंद्राच्या प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांनी यंदा आठ हजार राख्या तयार केल्या आहेत. अंधत्वावर मात करणारी त्यांची ही दृष्टी नक्कीच सर्वसामान्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणाºया या संस्थेत अकोल्यासह अन्य काही जिल्ह्यातील आठ-दहा प्रज्ञाचक्षु विद्यार्थी आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्यातील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न करणाºया या विद्यार्थ्यांनी सर्वसामान्यांना प्रेरणादायी ठरेल अशी डोळस किमया करून दाखविली आहे.
नागेश उपरवट, सिद्धार्थ उके, अनिकेत सोळंके, सागर भोपळे, गणेश मोहे, प्रशांत पाखरे, दुर्गा गवई, उमा राठी व मोनिका पळसुकर अशी या विद्यार्थ्यांची नावे असून, कुणी बीए प्रथम वर्षाला, कुणी द्वितीय तर कुणी तृतीय वर्षाला; कुणाचा तबला क्लास तर कुणाचा संगीत क्लास असा शैक्षणिक प्रवास सुरू आहे. दररोज महाविद्यालयांतील उपस्थिती आणि अभ्यास हा दिनक्रम सांभाळून या सर्वांनी शेकडो प्रकारच्या आठ हजार राख्या तयार केल्यात. विशेषत: मोती, क्रिस्टल्स आणि विविध प्रकारचे मणी रेषमी दोºयात ओवून तयार करण्यात आलेल्या या राख्यांचे बाजारपेठेतील स्पर्धेला अनुसरून पॅकिंग करण्यात आले आहे. यासोबतच या विद्यार्थ्यांनी ‘राखी स्पेशल चॉकलेट्स’ व ‘बुक मार्क्स’ तयार केले आहे.
शिक्षण सुरू असताना, अर्थार्जन करण्यास पुरक ठरणाºया या उपक्रमाला बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २८ व २९ जुलै रोजी शाळेत लावण्यात आलेल्या स्टॉलवर अक्षरश: विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती. गुरुवार, ३ आॅगस्ट रोजी जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातसुद्धा या राख्या विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला मूर्तरूप देण्यासाठी संस्थेच्या संचालिका मंजुश्री कुळकर्णी व गोविंद कुळकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले, तर कुटुंबातील सदस्य कीर्ती कुळकर्णी, वयोवृद्ध कुसुमताई कुळकर्णी, प्रमिला कुळकर्णी यांचासुद्धा मोलाचा हातभार लागला.