अकोल्याला ‘वान’च्या पाण्यासाठी किमान तीन वर्षे प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:04 PM2019-09-07T13:04:43+5:302019-09-07T13:05:03+5:30
पाणी अकोल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील, त्याला कमीत कमी दोन ते तीन वर्षे लागणार आहेत.
राजरत्न सिरसाट
अकोला : अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात यावर्षी अल्प जलसाठा असल्याने अकोल्यावर जलसंकट निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत वान धरणातून २४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण जाहीर केले आहे; परंतु हे पाणी अकोल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील, त्याला कमीत कमी दोन ते तीन वर्षे लागणार आहेत. तसेही अमृत योजनेंतर्गत या वाढीव पाणी पुरवठ्याचे २०३० पर्यंतचे नियोजन आहे.
अकोल्याची लोकसंख्या वेगाने वाढत असून, अकोला महापालिकेंतर्गत २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला आवशक दरडोई १४० लीटर पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांत काटेपूर्णा धरणाचे पाणी कमी पडत असून, मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अकोलेकरांनी आवश्यक पाण्याची पूर्तता होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कधी आठवड्यात दोन वेळा आता तर एकाच वेळी पाणी पुरवठा होत आहे. याच अनुषंगाने अमृत अभियानांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना येथे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वान धरणातून २४ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे; परंतु हे पाणी लगेच मिळणार नाही. अकोला ते वारी असा ८० ते ८८ किलोमीटरचा प्रवास करीत हे पाणी येथे येणार आहे. याकरिता जलवाहिनी टाकावी लागणार आहे. त्यासाठीच्या शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. कितीही वेगाने काम करायचे म्हटल्यास यात एखादे वर्ष कमी होइल.
६०० ते ९०० व्यासाची जलवाहिनी लागणार!
२४ दशलक्ष घनमीटर पाणी वाहून आणण्यासाठी किमान ६०० ते ९०० व्यासाची जलवाहिनी टाकावी लागणार आहे. याच्या कामाच्या प्रक्रियेसाठी किमान सहा महिने लागण्याची शक्यता आहे. हे काम १०० कोेटी किंवा जेवढी रक्कम या कामासाठी लागेल, त्याला प्रथम मान्यता मिळवावी लागणार आहे. त्यानंतर कामाच्या निविदा काढणे व अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे. या सर्व प्रक्रि येला एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याला मान्यता मिळविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करू न तो प्रथम शाखा कार्यालय, त्यानंतर उविभागीय मंडळ ते प्रादेशिक कार्यालय असा प्रवास करीत सचिव कार्यालय, नियोजन व वित्त विभाग त्यानंतर नियामक मंंडळाची मंजुरी घेऊन प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. पुन्हा हा प्रस्ताव या मार्गाने शाखा कार्यालयाकडे येणार, याला किमान एक वर्ष म्हणजे या सर्व प्रक्रियेला अडीच वर्षे लागतील.
गुणवत्ता नियंत्रण
निविदा काढल्यानंतर सर्वच विशेषतज्ज्ञांकडून तपासणी, गुणवत्ता नियंत्रण या सर्व कामासाठी तीन महिने लागण्याची शक्यता आहे.
निविदा कशा मंजूर होणार!
१०० कोटींची निविदा उघडल्यानंतर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवाव्या लागणार आहेत. त्यानंतर पुन्हा कार्यकारी अभियंता ते मंडळ, प्रादेशिक प्रवास करीत नियोजन, वित्त, सार्वजनिक बांधकाम व महाराष्टÑ राज्य जीवन प्राधिकरण सचिव निविदा मंजूर करतील. पुढच्या तीन महिन्यांत वर्क आॅर्डर म्हणजे प्रत्यक्ष कामाचा आदेश काढण्यात येईल.
जलशुद्धीकरण केंद्र बांधावे लागणार!
पाणी अकोल्यात आणल्यानंतर पाण्याचे शुद्धीकरण करावे लागणार आहे. त्यासाठीची जागा व पुन्हा या प्रक्रिया पार पाडाव्या लागतील. निविदा ते जलवाहिनी आदी कामे करण्यासाठी वेळ लागतो; परंतु कितीही वेगाने करायचे म्हटले तरी अकोल्यात पाणी पोहोचण्यासाठी तीन वर्षे तर नक्कीच लागणार आहेत.
तेल्हारा, अकोटला नियमित सिंचन होणार!
वान धरणातून अकोला शहराला पाणी सोडल्यास तेल्हारा, अकोट तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, या दोन्ही तालुक्यांतील सिंचनासाठी केवळ २५ दलघमीच पाण्याचा वापर होतो. मागच्या वर्षी एवढेच पाणी वापरण्यात आले. उर्वरित पाणी तसेच होते. त्यामुळे अकोल्याला पाणी सोडल्यास सिंचनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरे तर वान धरणात दरवर्षी शून्य साठा ठेवण्याचे नियोजन आहे. कारण सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या या धरणाचे पानलोट क्षेत्र हमखास पावसाचे आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
शेगाव व इतर गावांना मिळणार ‘जिगाव’मधून पाणी!
वान धरणातून सध्या जळगाव जामोद, १४० खेडी योजना तसेच शेगाव नगरपालिकेला १७.५ दलघमी पाणी पुरवठा करण्यात येतो. २०२० मध्ये नांदुरा तालुक्यातील जिगाव सिंचन प्रकल्पात पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे १७.५ दलघमी पाण्याचे आरक्षण शेगावसह या गावांना ‘जिगाव’मधून होणार आहे.
वान धरणातील पाण्याचे २०३० पर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे. त्यामुळे लगेच अकोल्याला पाणी मिळणार नाही. पुढच्या वर्षी जिगाव प्रकल्पात पाणी संचयाचे नियोजन आहे. शेगाव इतर गावांना त्यातून पाणी देण्यात येणार आहे. तसेही प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे. असे असले तरी तेल्हारा, अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.
- चिन्मय वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे विभाग, अकोला.