सुंदर चित्रांमुळे अकोल्यातील भिंती झाल्या आकर्षक; विद्यार्थ्यांनी रेखाटली सुंदर चित्रे
By Atul.jaiswal | Published: February 22, 2018 06:34 PM2018-02-22T18:34:02+5:302018-02-22T18:37:40+5:30
अकोला: मनपाने चित्रकलेची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मदतीने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर चित्र रेखाटली आहेत.
अकोला: स्वच्छतेच्या बाबतीत अकोला शहर आता कात टाकत आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ मोर्णा मोहिमेच्या प्रचंड यशानंतर नागरिकांनी स्वच्छतेचा ध्यासच घेतला आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी अकोलेकर सजग झाले आहेत. दरम्यान शहरवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मनपाने चित्रकलेची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मदतीने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर चित्र रेखाटली आहेत. हे चित्र जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अकोला स्वच्छ सर्वेक्षण-2018 अंतर्गत मनपाने सार्वजनिक भिंतींवर चित्र रेखाटण्याची मोहिम हाती घेतली आहे. शहरातील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविदयालयाच्या सुमारे 40 विदयार्थ्यांनी आज अशोका वाटीका समोरील वनविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतींवर स्वच्छतेविषयक संदेश देणारी असंख्य सुंदर चित्रे काढली. या चित्रांमुळे भिंती सजीव झाल्या असून शहराच्या सौंदर्यात वेगळी भर पडली आहे. अतिशय सुंदर अशी ही चित्रे अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य गजानन बोबडे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहरातील बसस्टँड, रेल्वेस्टेशन यासह मुख्य सार्वजनिक दहा ठिकाणांच्या भिंतींवर चित्र काढली जाणार आहेत.