अकोला-वाशिम जिल्ह्यातील कर्जमाफीला याद्या पडताळणीचा फेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:43 AM2017-11-23T02:43:34+5:302017-11-23T02:44:52+5:30
एक हजार शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बुधवारी बँकेला प्राप्त झाल्या असल्या, तरी पडताळणी करून संबंधित याद्या पुन्हा शासनाकडे सादर करावयाच्या आहेत. त्यामुळे याद्या पडताळणीच्या फेर्यातच अद्याप शेतकर्यांची कर्जमाफी अडकली आहे.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांतील दोन लाख शेतकर्यांच्या याद्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शासनाच्या ‘महाऑनलाइन पोर्टल’वर अपलोड करण्यात आल्या. त्यापैकी एक हजार शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बुधवारी बँकेला प्राप्त झाल्या असल्या, तरी पडताळणी करून संबंधित याद्या पुन्हा शासनाकडे सादर करावयाच्या आहेत. त्यामुळे याद्या पडताळणीच्या फेर्यातच अद्याप शेतकर्यांची कर्जमाफी अडकली आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या याद्या यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत शासनाच्या ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत कर्जमाफीस पात्र शेतकर्यांच्या याद्या नव्याने ‘महाऑनलाइन’ या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचा आदेश देण्यात आला.
त्यानुसार अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांतील कर्जमाफीस पात्र दोन लाख शेतकर्यांच्या याद्या २0 नोव्हेंबरपर्यंत ‘महाऑनलाइन’ पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. पात्र शेतकर्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि त्याआधारे ‘महा-आयटी’ विभागामार्फत ‘ग्रीन’ याद्या प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अपेक्षा करण्यात येत होती; परंतु अकोला व वाशिम जिल्ह्यांतील कर्जमाफीस पात्र शेतकर्यांच्या अपलोड करण्यात आलेल्या याद्यांपैकी दोन्ही जिल्ह्यांतील एक हजार शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या पडताळणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २२ नोव्हेंबर रोजी शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत प्राप्त झाल्या. त्यानुसार प्राप्त शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी करून बँकमार्फत शेतकर्यांच्या याद्या परत ‘महा-आयटी’ विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांची प्रत्यक्ष कर्जमाफी याद्या पडताळणीच्या फेर्यात अडकली आहे.
‘ग्रीन’ याद्यांची अशी होणार पडताळणी!
शासनाच्या महा-आयटी विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झालेल्या एक हजार शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रीन याद्यांमधील पात्र शेतकर्यांचे नाव, कर्जाची रक्कम, बँक व कर्ज खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी मुद्यांची पडताळणी बँकेमार्फत करण्यात येणार आहे.
दोन लाख शेतकर्यांच्या याद्या ‘अपलोड’
ल्ल कर्जमाफीस पात्र ठरलेल्या अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्यांच्या याद्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत महाऑनलाइन या पोर्टलवर २0 नोव्हेंबरपर्यंत अपलोड करण्यात आल्या. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख १२ हजार आणि वाशिम जिल्ह्यातील ८८ हजार शेतकर्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील ३९१ आणि वाशिम जिल्ह्यातील ६0९ अशा केवळ एक हजार शेतकर्यांच्या याद्या जिल्हा बँकेला पडताळणीसाठी प्राप्त झाल्या.
कर्जमाफी योजनेंतर्गत अपलोड केलेल्या शेतकर्यांच्या याद्यांपैकी अकोला व वाशिम जिल्ह्यांतील एक हजार शेतकर्यांच्या ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त ग्रीन याद्यांची पडताळणी करून पुन्हा या याद्या शासनाच्या महाऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावयाच्या आहेत.
-अनंत वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
-