Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:43 PM2020-01-10T14:43:05+5:302020-01-10T14:43:19+5:30
अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे.
अकोला: अकोला आणि वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीत कुण्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला स्वतंत्रपणे सर्वाधिक २३ जागा मिळाल्या आहेत. भारिपला दोन बंडखोरांसह आणखी दोन सदस्यांची गजर आहे. दुसरीकडे भारिप-बमसंपाठोपाठ शिवसेनेला १३ जागा आहेत. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेसकडे ४ तर राष्ट्रवादीकडे ३ जागा आहेत. ही आघाडी अस्तित्वात आल्यास सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या २७ च्या आकड्यासाठी सात सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ती सदस्य संख्या भाजपकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे समीकरण दिसून येते. या चार पक्षांची आघाडी होणार की नाही, ही बाब सध्यातरी अशक्य दिसत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर एकमेकांपासून कमालीची दुरावलेली भाजप-सेना जिल्हा परिषदेत एकत्र येईल, याची शक्यता किती, यावर नेतेही चूप आहेत. भाजप सोबत असताना काँग्रेस सहभागी होईल, याची शक्यताही तितकीच कमी असल्याचे चित्र सध्यातरी आहे.
५२ सदस्य संख्या असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजप ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. आता सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्य संख्या आवश्यक असून, महाविकास आघाडीचे संख्याबळ २७ असे होते. दुसरीकडे जनविकास आघाडी तसेच भारिप-बमसंकडून राष्टÑवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचीही चाचपणी सुरू आहे.