अकोला शहरात होणार पथदिव्यांचा झगमगाट!
By admin | Published: October 1, 2015 02:23 AM2015-10-01T02:23:49+5:302015-10-01T02:23:49+5:30
पथदिव्यांची निविदा मंजूर; वर्कऑर्डर जारी.
अकोला: आता शहरात सणासुदीच्या काळात पथदिव्यांचा झगमगाट पसरणार असून, यासाठी मनपा प्रशासनाने शहरात पथदिवे दुरू स्तीचे कार्यादेश दिले आहेत. पथदिव्यांचा प्रभागनिहाय कंत्राट रद्द केल्यानंतर आयुक्त अजय लहाने यांनी झोननिहाय निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश जारी केले होते.पथदिव्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मनपात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, आयुक्तांच्या तडकाफडकी निर्णयामुळे अकोलेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महापालिका क्षेत्रात पथदिवे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट प्रभागनिहाय देण्यात आले होते. नगरसेवकांच्या मर्जीतील कंत्राटदारांसह चक्क नातेवाईकांनाच कंत्राट बहाल केल्याने सर्वत्र अनागोंदी निर्माण झाली. प्रभागनिहाय रचना असल्यामुळे काही नगरसेवकांच्या भागातील पथदिवे जाणीवपूर्वक दुरुस्त केले जात नसल्याचे चित्र होते. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर महिन्याकाठी लाखो रुपयांचा खर्च होत असला तरी शहरातील प्रमुख मार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे. ही बाब आयुक्त अजय लहाने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पथदिव्यांचे प्रभागनिहाय कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच झोननिहाय कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. तसे निर्देश विद्युत विभागाला देण्यात आल्यानंतर झोननिहाय कंत्राटसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पश्चिम झोन वगळता इतर तीनही झोनसाठी ए.जे. इलेक्ट्रिकल्सची निविदा प्राप्त झाली असून, ती मंजूर करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराकडे केवळ देखभाल दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.