अकोल्यात होणार महाआरोग्य अभियान; पालकमंत्र्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:15 PM2018-12-12T14:15:16+5:302018-12-12T14:15:39+5:30
अकोला : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अकोला : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने ३0 व ३१ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात सोमवारी झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. घोरपडे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, आयएमएचे डॉ. नरेश बजाज, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील वाठोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिरसाम, डॉ. अश्विनी खडसे हे उपस्थित होते.
या अभियानात जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. अभियान यशस्वीतेसाठी बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विविध सूचना दिल्या. विविध कामांसाठी वेगवेगळ्या टीम नियुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या अभियानात सरकारीसह विविध खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचासुद्धा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स-रे, सोनोग्राफी, विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमआरआयसुद्धा काढून दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
अभियानात विविध आजारांसाठी साधारण ३0 बाह्यरुग्ण स्टॉल राहणार आहेत. नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे. सर्व प्रकारच्या तपासण्या अभियानात केल्या जाणार आहेत. या सर्व कामांसाठी टीमची नियुक्ती करावी, नोडल अधिकाºयाची नेमणूक करावी, तसेच परस्परांमध्ये समन्वय ठेवून जनसामान्यांना सुलभपणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना पालकमंत्री यांनी दिली. या अभियानाची जास्तीत प्रचार-प्रसिद्धी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार पूर्वतपासणी
अभियानापूर्वी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या रुग्णांची पुढील तपासणी महाआरोग्य अभियानात केली जाईल. अभियानात गंभीर आजाराचे निदान झाल्यास रुग्णांवर पुढील उपचारही केले जाणार आहेत, तसेच आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्डचे वाटप अभियान काळात केले जाणार आहे.