वान धरणातून अकोल्याला मिळणार पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:34 PM2019-09-06T12:34:46+5:302019-09-06T12:35:15+5:30
आता पाणी आणण्यासाठी महापालिकेला तातडीचे नियोजन करण्याची गरज आहे.
- राजरत्न सिरसाट,
अकोला : अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात यावर्षी अल्प जलसाठा असल्याने अकोल्यावर जलसंकट निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत वान धरणात २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, एका परिपत्रकान्वये पाटबंधारे विभागाला पाणी आरक्षणाचा आदेश दिला आहे. आता पाणी आणण्यासाठी महापालिकेला तातडीचे नियोजन करण्याची गरज आहे.
केवळ पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी काटेपूर्णा धरणात कि मान ३५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच अकोल्यासह ६४ खेडी व मूर्तिजापूरला पाणी पुरवठा करता येईल; परंतु काटेपूर्णा धरणात आजमितीस १०.५० टक्केच जलसाठा उपलब्ध असून, या पाण्यात पाच ते सहा महिनेच अकोलेकरांची तहान भागू शकते. अकोलेकरांवरील आलेले जलसंकट बघता, शासनाने अमृत अभियान अकोला शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत अकोलकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वान धरणात २४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण केले आहे. महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम २०११ यातील कलम ५ मधील १६ (क) नुसार जलसंपत्ती प्रकल्पामधील पाण्याचे क्षेत्रीय वाटप राज्यमंत्री मंडळाकडूनच करण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पिण्याच्या व औद्योगिक वापराच्या बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला देण्यात आले आहेत. यानुसारच, अमृत अभियानांतर्गत अकोला शहर वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, वान नदी धरणातून अकोल्याला २४ दलघमी पाणी मिळणार आहे.
या निर्णयानुसार भविष्यात दुष्काळी परिस्थितीत पाणी कपातीत सामोरे जावे लागल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार पाणी कपातीबाबतची जबाबदारी अकोला महापालिकेची असून, अकोला जिल्ह्यात कुठलाही पर्यायी शाश्वत उदभव उपलब्ध नसल्यामुळे अवर्षण वर्षात नियमित पाणी पुरवठा करणे शक्य नसल्यास उद्भवणाºया परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी घेण्यास महापालिका बांधील राहणार आहे.
वान धरणात ८९.७१ टक्के पाणी
अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या वान धरणाची जलाशय पातळी ४१०.२६ मीटर असून, आजचा उपयुक्त जलसाठा ७३.४७ दशलक्ष घनमीटर ८९.७१ टक्के आहे. दोन दिवसांपासून या पर्वतरांगांवर पाऊस सुरू असल्याने या धरणाचे गुरुवार, ५ सप्टेंबर रोजी दोन वक्रद्वार उघडण्यात आले आहेत. यातून ४० से.मी.चा विसर्ग होत आहे.
तर यावर्षी सिंचनाला पाणी नाही!
सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी धरणात ५० टक्के जलसाठा असावा लागतो. तथापि, काटेपूर्णा धरणात आजमितीस १०.५० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी या धरणाच्या सिंचन क्षेत्रात येणाºया शेतीला पाणी मिळणार नाही. वान धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अकोल्याला २४ दलघमी पाणी दिले तरी अकोल्यासाठीचा वापर किती होतो, हे सांगता येत नाही. त्यामुळे वान धरणातून सिंचनासाठी कोणताही अडथळा निर्माण होईल, असे वाटत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पर्यायी व्यवस्था करावीच लागणार!
शहर वाढल्याने अकोलेकरांची पाण्याची मागणी वाढली आहे. दरडोही १४० लीटर पाणी गरज बघता काटेपूर्णा धरणाची क्षमता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आपल्याकडे सततची पावसाची अनिश्चितता, काटेपूर्णा धरणात अर्धा गाळ साचलेला आहे. वान धरण छोटे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था जळगाव जिल्ह्यातील हातनूर किंवा अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातून करावी लागणार आहे. असा प्रस्तावही याअगोदर मनपाने केला होता.
पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३५ टक्के पाणी काटेपूर्णा धरणात असावे लागते. तथापि, आजमितीस या धरणात अल्प जलसाठा आहे; परंतु पावसाची शक्यता बघता येत्या महिन्यात यामध्ये २० टक्के पाणी संचय होण्याची शक्यता आहे. वान धरणातून २४ दलघमीचे आरक्षण करण्यात आले आहे.
- चिन्मय वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे विभाग, अकोला.