आसामच्या टॅटू आर्टिस्ट तरुणीची अकोल्यात हत्या; मित्राचा पोलिसांकडून शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:02 PM2024-07-25T16:02:28+5:302024-07-25T16:03:50+5:30
अकोल्यात मूळची आसामची असलेल्या एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय.
Akola Crime : अकोल्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोल्यात आसाममधील एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आसाममधील एका २६ वर्षीय तरुणीची डोक्यात अनेकवेळा वार करुन हत्या करण्यात आलीय. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरातील प्रतिक नगरमध्ये हा हत्येचा थरार घडला. कुणाल उर्फ सनी शृंगारे असं संशयित मारेकरी तरुणाचं नाव आहे. हत्येनंतर कुणाल हा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. फरार आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात आसाममधील टॅटू बनवणाऱ्या २६ वर्षीय शांतीक्रिया प्रशांत कश्यपची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शांतीक्रिया डोक्याच्या अनेक जखमांसह मृतावस्थेत आढळून होती. शांतीक्रियाची प्रियकर कुणालसोबत सोशल मीडियावर मैत्री झाली होती. मात्र दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर कुणालने शांतीक्रियाची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
शांतिक्रिया कश्यप उर्फ कोयल २४ जुलै रोजी मूर्तिजापूरच्या प्रतीक नगर भागातील एका घरात अनेक जखमांसह मृतावस्थेत आढळून आली होती. कोयल ही प्रियकर कुणालसोबत तिथे राहत होती. कुणाल हा या प्रकरणातील प्रमुख संशयित असून तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मूळची आसामची असलेला कोयल गेल्या सहा वर्षांपासून तिच्या आईसोबत दिल्लीत राहत होती. टॅटू आर्टिस्ट म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. गेल्या काही महिन्यांपासून ती मुंबईत देखील काम करत होती.
पोलिसांच्या तपासानुसार, कोयल आणि कुणाल यांची सोशल मीडियावरून मैत्री झाली होती. काही दिवसांपूर्वी कुणालने कोयलला मूर्तिजापूर शहरात बोलावून तिच्यासाठी नोकरी शोधण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती २१ जुलै रोजी मूर्तिजापूर आली आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी राहायला गेली. स्थानिक बारमध्ये वेटर म्हणून काम करणारा कुणाल हा तिथे एकटाच राहत होता. त्यानंतर तो कोयलला तो ज्या बारमध्ये काम करत होता तिथे घेऊन गेला होता. मात्र बार मालकानं तिला काम द्यायला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दोघेही तिथून परतले.
आरोपी कुणालला दारू पिण्याची सवय होती. २३ जुलै रोजी रात्री त्याच्यात आणि कोयलमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून काही तरी संशयास्पद घडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडला. घरातून त्यांनी कोयलचा मृतदेह बाहेर काढला. हत्येनंतर कुणाल हा फरार झाला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.