अकोला जिल्हा परिषदेत सीसी कॅमेरा खरेदीत गैरव्यवहार!

By Admin | Published: October 2, 2016 02:49 AM2016-10-02T02:49:56+5:302016-10-02T02:49:56+5:30

मर्जीतील पुरवठादारांनाच कंत्राट देण्याचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशी करण्याचा आदेश.

Akola Zilla Parishad buying cc camera fraud! | अकोला जिल्हा परिषदेत सीसी कॅमेरा खरेदीत गैरव्यवहार!

अकोला जिल्हा परिषदेत सीसी कॅमेरा खरेदीत गैरव्यवहार!

googlenewsNext

अकोला, दि. 0१ - जिल्हा परिषद सर्व पंचायत समित्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा खरेदीत वरिष्ठ शासकीय यंत्रणेकडून पंचायत समिती स्तरावर प्रचंड दडपण आणून, मर्जीतील पुरवठादारांनाच कंत्राट देण्याचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी मुख्य सचिवांना चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
आमदार सावरकर यांच्या तक्रारीनुसार, जिल्हा परिषद/पंचायत समिती अंतर्गत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने सुमारे ३0 लाख रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक गैरमार्गाने खरेदी करण्यात आले. नियोजन समितीला अंधारात ठेवत जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ६ फेब्रुवारी २0१६ रोजी सर्व प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली. विशेष म्हणजे, जिल्हय़ातील सर्व पंचायत समित्यांनी ६ फेब्रुवारी रोजीच जिल्हय़ात सर्वत्र साहित्य खरेदीचे सर्व सोपस्कार पार पाडून निविदा बोलाविल्या. ठरावीक तीन कंत्राटदारांनीच सर्व ठिकाणी दरपत्रक निविदा सादर केल्या. त्यामध्ये अकोला येथील एक, जालना व औरंगाबाद येथील दोन पुरवठादारांचा समावेश आहे. निविदा सुचनांना नियमानुसार पुरेशी प्रसिद्धी देण्यात आली नाही. तसेच सूचना फलकावर नोटीस प्रसिद्ध न केल्यामुळे स्थानिक पुरवठादारांना डावलून मर्जीतील पुरवठादारांना लाभ देण्यासाठीच ही निविदा प्रक्रिया राबविल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला आहे.
ज्या बाबींची खरेदी करावयाची होती, तशाच प्रकारच्या बाबींचे दरपत्रक त्याच पुरवठादारांकडून आमदार सावरकर यांनी मागविले असता, त्यांनी निविदेत भरलेले दर व प्रत्यक्ष दरांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली. साधारणपणे ५५00 रुपये किमतीच्या कॅमेर्‍याची खरेदी २९,२५0 रुपयांत, ९000 रुपयांच्या डीव्हीआर ४९,२५0 रुपयांत, १८ रुपये प्रति मीटरची केबल १८0 रुपयांत, ६00 रुपयांचा पॉवर अँडाप्टर २८00 रुपयांत, तर ११ हजारांची हार्डडिस्क १८ हजार रुपयांत खरेदी करण्यात आली. फिटिंग खर्च साधारणपणे पाच हजार रुपये अपेक्षित असताना, तो २0 हजार रुपये दाखविण्यात आला. शिवाय बाजारपेठेत उपलब्ध नसलेल्या सॉफ्टवेअरची खरेदी ५३ हजार रुपयांना दाखविण्यात आली. दरांमध्ये अशी प्रचंड तफावत सकृद्दर्शनी दिसून आली.

Web Title: Akola Zilla Parishad buying cc camera fraud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.