Akola: जिल्हा परिषद ‘सीइओं’नी बसमध्ये केली मतदार जागृती! प्रवाशांसोबत साधला संवाद
By संतोष येलकर | Published: March 23, 2024 08:42 PM2024-03-23T20:42:11+5:302024-03-23T20:42:43+5:30
Akola News: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी अकोला शहरातील जुने बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ बी. वैष्णवी यांनी मतदार जागृती केली.
- संतोष येलकर
अकोला - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी अकोला शहरातील जुने बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ बी. वैष्णवी यांनी मतदार जागृती केली. बसमधील प्रवाशांसोबत संवाद साधत त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत असून, ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
त्यामध्ये शुक्रवार, २२ मार्च रोजी सायंकाळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ उपक्रमाच्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांनी शहरातील टाॅवर चौकस्थित जुने बसस्थानक येथे भेट दिली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसमध्ये जाऊन त्यांनी प्रवाशांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करीत त्यांनी मतदार जागृती केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी विनय ठमके, माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. सुचिता पाटेकर, स्वीप समिती सदस्य गजानन महल्ले, विशाल उपाध्याय आदी उपस्थित होते.
खेळाडूंमध्येही केली मतदार जनजागृती !
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप ’ उपक्रमाच्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी शहरातील वसंत देसाई क्रीडांगण येथे उपस्थित राहून खेळाडू व उपस्थित नागरिकांमध्येही मतदार जनजागृती करण्यात आली.