अकोला जिल्हा परिषद सभापती निवड दोन दिवसांवर; पक्षांमध्ये सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:40 PM2020-01-28T15:40:16+5:302020-01-28T15:40:23+5:30
सत्तेतील ही पदे काबीज करण्यासाठी राजकीय पक्षस्तरावर सामसूम असल्याचे चित्र आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची निवड प्रक्रिया दोन दिवसांवर आली आहे. त्याच वेळी सत्तेतील ही पदे काबीज करण्यासाठी राजकीय पक्षस्तरावर सामसूम असल्याचे चित्र आहे.
भारिप-बमसंकडेला पदाधिकारी निवडीसाठी आणखी दोन सदस्यांची गरज आहे. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष मिळून सदस्य संख्या २१ एवढी आहे. भाजपकडे ७ सदस्य आहेत. अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत या संख्याबळाच्या समीकरणात भाजपच्या सदस्यांनी बहिर्गमन केल्याने भारिप-बमसंला संधी मिळाली. त्याच वेळी भाजपचे सदस्य सभागृहात उपस्थित असते तर ५३ पैकी सदस्य संख्येतून बहुमत म्हणजे, २७ चा आकडा गाठावा लागला असता. ती संधी आता चार सभापतींच्या निवड प्रक्रियेतही मिळेलच, याची कोणतीही शाश्वती सध्या तरी नाही. सभापती निवडीच्या सभेत संख्याबळाचे कोणतेही समीकरण अस्तित्वात येऊ शकते. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष भारिप-बमसंसोबत येणार की भाजप महाविकास आघाडीत सहभागी होणार, हे निवड प्रक्रियेतील मतदानाच्या वेळी स्पष्ट होणार आहे. याबाबत भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्याचवेळी भारिप-बमसंकडूनही चाचपणी सुरू झाली आहे.
काँग्रेसची भूमिका आज ठरणार
काँग्रेसची भूमिका ठरवण्यासाठी उद्या मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभेनंतर नेत्यांची चर्चा होणार आहे. पक्षाचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका समजून घेतली जाईल. त्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेनेसोबत चर्चेअंती निर्णय बुधवारी होऊ शकतो. निवड प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका म्हणून सहभाग घ्यावा लागतो. त्यानुसार तो घेतला जाईल. कोण सोबत येईल, हा मुद्दा नंतरचा आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी सांगितले.