जिल्हा परिषदेसाठी पक्षांचे ‘स्टार प्रचारक’ गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:30 PM2019-12-29T12:30:52+5:302019-12-29T12:31:17+5:30
भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बमंस या चार पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोण धावून येणार, हा मुद्दा अखेरच्या दिवसातही अनुत्तरीत आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमात पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणाऱ्या प्रमुख राजकीय नेते, स्टार प्रचारकांची यादी महिनाभरापासून निवडणूक आयोगाला मिळालीच नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बमंस या चार पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोण धावून येणार, हा मुद्दा अखेरच्या दिवसातही अनुत्तरीत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० नेत्यांची यादी निवडणूक विभागाला देण्यात आली आहे.
राज्यातील सहा जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, आता निवडणूक रिंगणातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट होत आहे. त्यानंतर उमेदवारांच्या प्रचारासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत. या अल्प कालावधीत पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रचार झाल्यास त्याचा फायदा उमेदवारांना होऊ शकतो. ही जबाबदारी स्टार प्रचारकांची असते. पक्ष स्तरावरून स्टार प्रचारकांची नावे आयोगाकडे दिली जातात. आयोगाला माहिती दिल्यानंतर ती यादी स्थानिक प्रशासनाकडे पुढील खबरदारीसाठी दिली जाते. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर रोजीच तसे पत्र सर्वच राजकीय पक्षांना दिले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाने स्टार प्रचारकांची यादी आयोगाकडे दिली नसल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर या सहा जिल्हा परिषदांसह ४४ पंचायत समित्यांची निवडणूक होत आहे. राज्यात एकाच वेळी निवडणूक होत आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे. पक्षांच्या एबी फॉर्मवर उमेदवार लढत असल्याने त्यांचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारक देण्याची जबाबदारीही पक्षांची आहे; मात्र जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्याकडे जात असताना राजकीय पक्षांच्या पातळीवर कमालीची सामसूम पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २० नेत्यांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील अमोल मिटकरी यांना स्थान दिले आहे. त्यापैकी किती नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जातात, यावरही उमेदवारांचा प्रचार आणि विजयाचे गणित अवलंबून आहे.