जिल्हा परिषदच्या चार सभापतींची ३० ला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 02:02 PM2020-01-21T14:02:20+5:302020-01-21T14:02:31+5:30
जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापतींसह चार सभापतींची निवड करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. विशेष सभेच्या नोटीस सोमवारी जिल्हा परिषद सदस्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी करण्यात आली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापतींसह चार सभापतींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा जिल्हा परिषद सभागृहात बोलविण्यात आली आहे.
या विशेष सभेत चार सभापतींची निवड करण्यात येणार असून,सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सभापती पदांसाठी सदस्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. सभापतींची निवड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेच्या नोटीस सोमवारी जिल्हा परिषद सदस्यांना पाठविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
पीठासीन अधिकारीपदी ‘एसडीओं’ची नियुक्ती !
जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची निवड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या जिल्हा परिषद विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नीलेश अपार यांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे.