जिल्हा परिषद खातेवाटपाची सभा ११ फेब्रुवारी रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:00 PM2020-02-05T14:00:43+5:302020-02-05T14:01:00+5:30
कोणत्या समित्यांचे वाटप होईल, हे सभेपूर्वी ठरणारच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह दोन सभापतींना सहा विषय समित्यांचे वाटप करणे तसेच समित्यांची रचना करण्यासाठीची विशेष सभा येत्या ११ फेब्रुवारी रोजी बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी सभेच्या नोटीस उद्या बुधवारी सदस्यांना पाठविल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सावित्री राठोड, सभापतीपदी निवड झालेले चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ यांना सहा विषय समित्यांपैकी प्रत्येकी दोन समित्या दिल्या जाणार आहेत. आधीच्या रचनेत उपाध्यक्षांकडे बांधकाम व आरोग्य समिती होती, तर उर्वरित दोनपैकी एका सभापतीकडे कृषी व पशुसंवर्धन तर दुसऱ्या सभापतीला अर्थ व शिक्षण समित्यांचे वाटप झाले होते. यावेळी कोणत्या समित्यांचे वाटप होईल, हे सभेपूर्वी ठरणारच आहे. त्याचवेळी या दोन्ही सभापतींनी दालनावर ताबा घेतला आहे. त्यापैकी आधी कृषी व पशुसंवर्धन सभापतीसाठी असलेल्या दालनात पंजाबराव वडाळ तर अर्थ व शिक्षण सभापतींच्या दालनात चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचे नामफलक लावण्यात आले आहे. त्या दालनांचा विचार केल्यास या पद्धतीनेच समित्यांचे वाटप होण्याचे संकेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्वच विषय समित्यांमध्ये किमान ७ व त्यापेक्षा अधिक सदस्यांची निवड केली जाते. त्यामुळे कोणता सदस्य कोणत्या समितीवर जाईल, याचीही रणनीती सत्ताधारी, विरोधी सदस्यांकडून ठरविली जाणार आहे. त्यामध्ये समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, बांधकाम, शिक्षण, अर्थ, कृषी, पशुसंवर्धन, जलव्यवस्थापन या समित्या आहेत.