अकोला जिल्हा परिषदेचा कारभार आता संगणकावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:12 PM2019-05-04T14:12:39+5:302019-05-04T14:12:43+5:30
अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे.
अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’ कंपनीसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषदमार्फत सद्यस्थितीत ३५ प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. योजनांची गुणवत्ता जपण्यासाठी आणि योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेत पुनरावृत्ती (रिपीटेशन) होऊ नये तसेच योजनांचा लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. विकासकामे आणि प्रशासकीयदृष्ट्या कामांचा आढावादेखील या प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामासाठी लागणारा वेळ, अर्जांसाठी लाभार्थींचा होणारा खर्च वाचणार असून, कामानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही आणि जिल्हा परिषदेचे कामकाज कागदविरहित (पेपरलेस) होणार असल्याचेही सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे,जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे उपस्थित होते.
पाणीटंचाईच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा सज्ज!
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई संदर्भात तक्रार निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असून, पाणीटंचाई निवारणासाठी गावनिहाय उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली. भूजल पातळी खोल गेल्याने जिल्ह्यात १०५ हातपंप बंद पडले असून, १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून हातपंप दुरुस्तीची कामे करण्यत येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.
प्रत्येक ग्रा.पं. अंतर्गत ‘रोहयो’चे एक काम!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान एक काम सुरू करण्यात येणार आहे, त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे, असे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.
६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा!
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उचल करण्याकरिता दोन पंप नादुरुस्त झाल्याच्या स्थितीत सुकळी येथील तलावातून तात्पुरत्या स्वरूपात ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.