अखेर अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला राजीनामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 10:49 AM2021-06-19T10:49:59+5:302021-06-19T10:50:06+5:30
Akola Zilla Parishad president finally resigns : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार आहेत.
अकोला : पक्ष संघटनेच्या आदेशाप्रमाणे अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे गुरुवारी सादर केला असून, त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकासकामांची अंमलबजावणी तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कारभार सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश गेल्या महिनाभरात दोनदा दिला होता. पक्ष संघटनेच्या आदेशाप्रमाणे अखेर प्रतिभा भोजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, राजीनामा पत्र १७ जून रोजी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे सादर केले. जिल्हा परिषद अध्यक्ष भोजने यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारायचा की नाही, यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर लवकरच घेणार आहेत. त्यामुळे यासंदर्भात ॲड. आंबेडकर काय निर्णय घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विभागीय आयुक्तांकडे राजीनामा सादर करणार?
पक्ष संघटनेच्या आदेशाप्रमाणे प्रतिभा भोजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सादर केला असला तरी, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष भोजने यांच्यासह पक्षाकडून अमरावती विभागीय आयुक्तांकडे राजीनामा सादर करण्यात येणार की नाही, याकडे आता लक्ष लागले आहे.
पक्ष संघटनेच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी दिलेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्याकडे गुरुवारी प्राप्त झाला. त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर अंतिम निर्णय घेतील.
- डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर
प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.