अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:45 AM2020-09-09T10:45:20+5:302020-09-09T10:45:30+5:30
त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांसह आठ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्यात आले.
अकोला : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण (सॅनिटाइझ) करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांसह आठ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर आॅगस्टमध्ये जिल्हा परिषदेतील अर्थ आणि आरोग्य विभागातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्यासह त्यांचे पती हिरासिंग राठोड कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्या संपर्कातील चार कर्मचारी आणि मुलासह आठ जणांच्या घशातील स्रावाचे (थ्र्रोट स्वॅब) नमुने घेण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.
कार्यालय कुलूपबंद!
जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने, जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत उपाध्यक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे.