अकोला जिल्हा परिषदेच्या १७ शाळा होणार बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:54 AM2017-12-13T02:54:17+5:302017-12-13T02:56:18+5:30
अकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अंतर १ ते ७ किमी आहे. शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अंतर १ ते ७ किमी आहे. शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांना एक किमीच्या आतच शिक्षणाची सोय असावी, अशी शिक्षण हक्क कायद्यातील तरतूद आहे; मात्र अकोला जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्याच नाही. गुणवत्तेच्या कारणामुळे पटसंख्या खालावली आहे. त्यामुळे त्या शाळाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या शाळांतील विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता असलेल्या शाळेत टाकण्याची तयारी केली. त्यासाठी शाळेत सर्व वर्गातील मिळून १ ते १0 पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागवण्यात आली. त्या शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांची लगतच्या शाळेत व्यवस्था करण्याचा पर्याय मागवण्यात आला.
त्यानुसार अकोला जिल्हय़ातील १७ शाळांमध्ये कमी पटसंख्या आहे. त्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर केला. प्रस्तावाला मंजुरीनंतर शाळा बंद केल्या जाणार आहेत. त्या १७ शाळांतील चिमुकल्यांना आता ऊन, पाऊस, वार्याचा सामना करीत शिक्षण घ्यावे लागणार आहे.
बंद करून समायोजन होणार्या शाळा
जिल्हा परिषदेच्या १७ गावांतील शाळा बंद करून नवी गावच्या शाळेत समायोजित होत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सोनाळा येथील विद्यार्थ्यांना हातगावातील शाळेत जावे लागणार आहे. या गावांचे अंतर सात किमी आहे. साहित येथील विद्यार्थी राहित, मालपुरा-तळेगाव, लखमापूर-निहिदा, अदालतपूर-गौलखेडी, मोझरी-पारडी, जामठी खुर्द उर्दू शाळा- जामठी बुद्रूक, ठोकबर्डी- हिंगणी, सोनगिरी-कसुरा, अडोशी-कडोशी, मंडाळा-खांबोरा, दुधाळा-हातरुण, गुंजवाडा-खापरवाडा, कापरखेडा-शेखापूर, वणी-वरुड, कवठा खुर्द- सावरगाव उर्दू, वडगाव रोठे- दहीगाव या जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजित होत आहेत.