अकोला जिल्हा परिषदेचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत ठाकरेला जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:45 PM2017-12-26T22:45:04+5:302017-12-26T22:47:55+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ विभागाचे सभापती पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी ठाकरेचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्षण सभापती यांचा स्वीय सहायक असलेला श्रीकांत ठाकरे हा जिल्हा परिषदेच्या शाळांना होणार्या पोषण आहारात खंड पडल्याबाबतची माहिती विचारून तेल्हारा येथील तक्रारकर्त्यास त्रास देत होता. शिक्षण विभागाच्या बैठकीतही ठाकरे हा मुद्दा वारंवार उपस्थित करून तक्रारदाराचा पैशांसाठी छळ करण्याचा प्रयत्न करीत असे. पोषण आहारात खंड का पडला, याबाबतची माहिती द्यायची नसेल, तर त्या मोबदल्यात दर महिन्याला पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी श्रीकांत ठाकरे याने तक्रारदाराकडे केली होती. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचखोर ठाकरेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून ‘एसीबी’च्या कर्मचार्यांनी पाळत ठेवून गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास श्रीकांत ठाकरे याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. आरोपी श्रीकांत ठाकरेकडून पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
सभापती अरबट संशयाच्या पिंजर्यात
शिक्षण व अर्थ विभागाचे सभापती पुंडलिकराव अरबट हे पोलिसांसमोर हजर न झाल्याने ते संशयाच्या पिंजर्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या स्वीय सहायक श्रीकांत ठाकरे याला पाच हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर यामध्ये सभापती अरबट यांचाही सहभाग आहे का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत; मात्र पोलिसांना अद्याप ठोस पुरावा मिळाला नसला, तरी ठाकरे यांच्या बयानातील काही मुद्यांवरून त्यांच्यावर संशयाची सुई जात आहे.