Akola ZP : भारिप-बमसंचा चारही सभापती पदांवर दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:18 AM2020-01-29T10:18:59+5:302020-01-29T10:19:10+5:30
जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर भारिप-बमसंचे उमेदवार विजयी होतील, असा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केला आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर भारिप-बमसंचे उमेदवार विजयी होतील, असा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केला आहे. त्याचवेळी सभापती निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सभागृहात लढत देतील, असे पक्षाचे गटनेते गोपाल दातकर यांनी सांगितले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीसोबत चर्चा केल्यानंतर उद्या निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत चार विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया गुरुवारी होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून उद्या बुधवारी हालचालींना वेग येणार आहे. त्यासाठी पक्षांची भूमिका ठरण्याची प्रतीक्षा होती. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या निकालानंतर अध्यक्ष पदाच्य्या निवडीसाठी अस्तित्वात आलेली शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्षाची महाविकास आघाडी कायम राहणार आहे. सभागृहात या पक्षांचे अनुक्रमे, १३, ४, ३, १ एवढे संख्याबळ आहे. या संख्याबळावर सभापती पदासाठी उमेदवारही दिले जाणार आहेत. त्यामध्ये आघाडीतील घटक पक्षांचे तीन तर एक अपक्ष सदस्याची उमेदवारी राहणार आहे. भारिप-बमसंच्या उमेदवारांसोबत त्यांची लढत होणार आहे. भारिप-बमसंचे संख्याबळ २५ आहे, तर भाजपचे ७ सदस्य आहेत. सभापती निवड प्रक्रियेदरम्यान सभागृहात भाजप कोणाच्या बाजूने राहणार की तटस्थतेची भूमिका घेणार, यावरही निवड कोणत्या पक्षाच्या उमेदवारांची होईल, हे स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आता सोबतच राहणार आहेत. त्यानुसार चारही सभापती पदांसाठी अर्ज दाखल केले जातील. सभागृहात लढत दिली जाईल. भाजपकडून कोणतीही अपेक्षा नसल्याने चर्चेचा मुद्दा शिल्लक नाही.
- गोपाल दातकर, गटनेते, शिवसेना.
तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे सभापती निवड प्रक्रियेबाबत प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा झालेली नाही. उद्या बुधवारी त्यांच्याशी चर्चेनंतर भाजपची भूमिका निश्चित होईल.
- तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप.
चारही सभापती ताब्यात ठेवण्याची तयारी केली आहे. पक्षाकडून चारही पदांसाठी उमेदवार दिले जातील. समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरु असून ती चर्चा निश्चितच फलद्रुप होईल.
- प्रदीप वानखडे,
जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं.