Akola ZP Election : भारिप-बमसं ठरला सर्वात मोठा पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 07:01 PM2020-01-08T19:01:45+5:302020-01-08T19:03:16+5:30
अकोला : गेल्या विस वर्षापासून जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या भारिप-बमसंने यावेळीही ५३ पैकी २३ जागा काबिज केल्या आहेत. ...
अकोला : गेल्या विस वर्षापासून जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या भारिप-बमसंने यावेळीही ५३ पैकी २३ जागा काबिज केल्या आहेत. दोन अपक्ष पक्षाचे बंडखोर असून ती संख्या २५ वर पोहचणार आहे. सत्तास्थापनेसाठी २७ सदस्यांचे बळ लागणार असून त्यासाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून भारिप-बमसं दावेदार ठरला आहे. तर शिवसेनेला जागा ८ वरून १३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ११ पैकी ७ जागा टिकण्यातच यश मिळाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संख्येत एकने वाढ होऊन ती ७ वर पोहचली आहे.
गेल्या पाच वर्षात भारिप-बमसंने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेत सत्ता चालवली. तर शिवसेना, भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते. सुरूवातीच्या काळात काँग्रेसला एक सभापतीपद त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पद देण्यात आले. त्यावेळी भारिप-बमसंला एकुण २१ जागा मिळाल्या होत्या. तर इतर अपक्ष मिळून त्यांची संख्या २३ होती. आता भारिप-बमसंचे २३ सदस्य विजयी झाले. तर दोन अपक्ष या पक्षाचे बंडखोर आहेत. त्यामुळे या पक्षाच्या सदस्यसंख्येत २ ने वाढ झाली आहे. तर
भाजपला गेल्या काळात असलेली ११ सदस्यसंख्याही टिकवता आली नाही. या पक्षाच्या ४ जागा घटल्या आहेत. त्याचवेळी शिवसेना गेल्या काळात ८ जागांवर असताना त्या पक्षाला आता १३ जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या जागांमध्ये ५ ने वाढ झाली आहे. काँग्रेसला ४ तर राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. या दोन पक्षाला एक जागा अधिक मिळाली आहे.
सत्तेच्या समिकरणात भारिप-बमसंला अवघ्या दोन ते तीन सदस्यांची गरज आहे. त्यासाठी आता कोणाला जवळ केले जाते, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. तर शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून बहुमताचा २७ आकडा गाठता येतो. मात्र, राज्यातील सत्तातरानंतर हे समिकरण जुळणे अशक्य असल्याचे चित्र सध्यातरी आहे.