Akola ZP Election : महाविकास आघाडीही सत्ता स्थापनेच्या तयारीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:50 AM2020-01-10T11:50:53+5:302020-01-10T11:50:58+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका याबाबत काय राहील, यावरच त्या स्थानिक महाविकास आघाडीचा डोलारा उभारला जाण्याची शक्यता आहे. रा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून असलेल्या भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळीही होऊ शकते. त्यासाठी स्थानिक पातळीवर भाजपला सोबत घेऊन सत्ता काबीज करण्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका याबाबत काय राहील, यावरच त्या स्थानिक महाविकास आघाडीचा डोलारा उभारला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता, ही आघाडी कितपत यशस्वी होऊ शकते, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. तर समविचारी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली जाईल, असे भारिप-बमसंने स्पष्ट केले. त्याचवेळी सर्व पर्याय खुले असल्याचेही म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला स्वतंत्रपणे सर्वाधिक २३ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेला १३ जागा आहेत. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेसकडे ४ तर राष्ट्रवादीकडे ३ जागा आहेत. ही आघाडी अस्तित्वात आल्यास सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या २७ च्या आकड्यासाठी सात सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ती सदस्य संख्या भाजपकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे समीकरण दिसून येते.
या चार पक्षांची आघाडी होणार की नाही, ही बाब सध्यातरी अशक्य दिसत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर एकमेकांपासून कमालीची दुरावलेली भाजप-सेना जिल्हा परिषदेत एकत्र येईल, याची शक्यता किती, यावर नेतेही चूप आहेत, तर भाजपसोबत असताना काँग्रेस सहभागी होईल, याची शक्यताही तितकीच कमी असल्याचे चित्र सध्यातरी आहे.
भारिप-बमसंकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. त्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेतले जाईल. त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्याचवेळी सत्तास्थापनेबाबत सर्वच पर्याय खुले आहेत. सत्ता भारिप-बमसंचीच येईल, असेच प्रयत्न सुरू आहेत. दोन अपक्ष मिळून पक्षाकडे २५ सदस्यसंख्या झाली आहे. त्यामुळे पक्षाला गरज असलेल्या सदस्य संख्येएवढा आकडा निश्चितपणे जुळणार आहे. पदाधिकारी निवडीची तारिख निश्चित झाल्यानंतर या प्रक्रीयेला वेग येणार आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १७ रोजी!
जिल्हा परिषदेच्या प्रशासक नियुक्ती संदर्भातील आदेश व इतर प्रशासकीय बाबी पाहता येत्या १७ जानेवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. ही तारिख उद्या शुक्रवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. तर सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. त्यानंतर प्रथम सभापती निवड करून त्यापुढील काळात अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे.
अपक्षांची मनधरणी सुरू
दरम्यान, जिल्ह्यात निवडून आलेल्या तीनपैकी दोन अपक्ष उमेदवार भारिप-बमसंच्या कुटुंबातीलच आहेत. पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी त्यांच्या भेटी घेत चर्चा केली. त्यानुसार बोरगाव मंजू येथील निता संदीप गवई, दानापूरच्या दीपमाला दामधर या दोन्ही सदस्या पक्षासोबत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.